उद्योजकांना मार्गदर्शनासाठी DES च्या वतीने उद्योजकता संशोधन केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DES

उद्योजकांना मार्गदर्शनासाठी DES च्या वतीने उद्योजकता संशोधन केंद्र

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES) वतीने नवोदित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‌घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता.५) सायंकाळी पाच वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी दिली.

व्यवस्थापन तज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या स्मरणार्थ हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी स्पेल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा, ल्युपिन रिसर्च पार्कचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीज पाल सिंग, डॉ. सुषमा केसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सोसायटीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्चच्या (आयएमडीआर) संचालिका डॉ. शिखा जैन आदी उपस्थित होते.

‘‘नावीन्यपूर्ण कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन या केंद्राद्वारे दिले जाणार आहे. नवोदित उद्योजकांच्या विचार प्रक्रियेला आकार देणे, व्यवसायाची योजना तयार करणे, कौशल्य विकसित करणे, बाजारपेठेचे सर्वेक्षण, वित्तपुरवठा योजनांची माहिती, विविध परवाने मिळविणे अशा उद्योजकाला आवश्यक असणारे गुण विकसित करण्यासाठी या केंद्रावर मार्गदर्शन मिळणार आहे. केंद्रासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आदी उपलब्ध करून देण्यात येणार असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे,’’ असे आठवले यांनी सांगितले.

‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर उद्योजकता संशोधन केंद्रा’चे असे असेल वैशिष्ट्ये :

- नवीन कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी मिळणार मार्गदर्शन

- नवोदित उद्योजकांना केंद्रामार्फत मूलभूत सुविधा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा उपलब्ध होणार

- उद्योगाला अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी गुंतवणूकदार शोधण्यास मिळणार मदत

- तज्ञांकडून मिळणार धडे

टॅग्स :Pune Newsdeccan society