घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घेतला अवयवदानाचा निर्णय

अर्जुन शिंदे
Friday, 25 December 2020

त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वसहमतीने त्याचे मूत्रपिंड, डोळे, हृदय, यकृत आदी अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

आळेफाटा : बेल्हे (ता. जुन्नर) येथील मजुरीचे काम करणारे संतोष धोंडीभाऊ बांगर (वय ४३) यांचे नुकतेच मजुरीकाम करताना अपघात होऊन त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वसहमतीने त्याचे मूत्रपिंड, डोळे, हृदय, यकृत आदी अवयव दान करण्याचा निर्णय घेऊन इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

पगार 'लॉक' केल्यामुळं सरकारी वकिलांचं बजेट झालं 'डाउन'!​

बेल्हे येथील संतोष धोंडीभाऊ बांगर हे एका स्थानिक बांधकाम व्यवसायिकाकडे मजुरीचे काम करत होते. यावेळी लाकडी फळीवरुन पाय घसरुन पडल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या मेंदूला जबर मार लागला. सुरुवातीला आळेफाटा येथे व नंतर पुणे येथे डी. वाय. पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

उपचारादरम्यान ब्रेनडेड झाल्याने दोन दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांची पत्नी, वृद्ध आई, लहान भाऊ, बहिणींसह इतर नातेवाईकांना घरातील कर्ता पुरुष गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचा लहान भाऊ कैलास यांना अवयवदानाचे महत्व सांगितले. यामुळे इतर चार जणांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव झाल्याने कैलास यांनी कुटुंबियांशी चर्चा केली. या अशिक्षित कुटुंबाने सर्वसहमतीने मृत संतोष बांगर याचे मूत्रपिंड, डोळे, हृदय, यकृत आदी अयवदानाला संमती देऊन मनाची श्रीमंती दाखविली.

दरम्यान, मृत संतोष यांना वडील नाहीत, तसेच त्यांचा लहान मुलगा इयत्ता सातवीत शिकत आहे. या मजुर तरुणाच्या अशिक्षित कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळे इतर चार गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकणार आहेत. दरम्यान त्यांचा लहान भाऊ कैलास हा रांजणगाव एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करतो.

(संपादन : सागर डी. शेलार)
       


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The decision to donate organs was taken by the family members after the death of the person