तमाशा फडमालक, कलावंतांना दिलासा; प्रश्‍न सोडविण्यासाठी कलाकार महामंडळाची करणार स्थापना

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

तमाशा फडमालक, कलावंत यांच्या अडचणींबाबत बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत बैठक झाली.

नारायणगाव - तमाशा फडमालक, कलावंत व लोककला जतन करणारे इतर कलाकार यांच्या आर्थिक व इतर समस्या सोडविण्यासाठी कलाकार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मुंबईत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आमदार अतुल बेनके यांनी ही माहिती दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्चमध्ये लॉकडाउनमुळे तमाशा हंगाम वाया गेला. फडमालक व कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. उदरनिर्वाहासाठी मार्चपासून कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये मानधन द्यावे, तमाशासाठी स्वतंत्र महामंडळ असावे, फडमालकांना आर्थिक पॅकेज मिळावे, तमाशा उभारणीसाठी राष्ट्रीयकृत बॅंकेतून 25 लाख रुपयांचे कर्ज मिळावे, ऑक्‍टोबरपासून तमाशा कार्यक्रमांना परवानगी मिळावी, सरकारने कलावंतांचा विमा काढावा, फडमालक व कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण व घरकुल योजनेचा लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ फडमालक व कलावंतांनी सोमवारी नारायणगावात उपोषण केले होते. त्यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी खेडकर यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधत मुंबईत आमदार बेनके यांच्या उपस्थितीत फडमालकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या बैठकीला खेडकर, अखिल भारतीय मराठी तमाशा मंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले, लक्ष्मीकांत खाबिया, फडमालक मालती इनामदार, शांताबाई संक्रापूरकर, शफी शेख, राजू गायकवाड उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तमाशा फडमालक, कलावंत यांच्या अडचणींबाबत बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत बैठक झाली. त्यात कलाकार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कलाकार महामंडळासाठी सांस्कृतिक विभागाकडून निधीची तरतूद केली जाईल. 
अतुल बेनके, आमदार 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

फडमालक व कलावंतांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी दिले आहे. यामुळे अडचणीत सापडलेले फडमालक व कलावंतांना दिलासा मिळाला आहे. 
रघुवीर खेडकर, अध्यक्ष, राज्य तमाशा फडमालक कलावंत मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to set up the Artists Federation was taken at a meeting in Mumbai