दस्त नोंदणीतून ३४ हजार कोटींचा महसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deed registration

दस्त नोंदणीतून ३४ हजार कोटींचा महसूल

पुणे : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीत घट झाली. परंतु दस्त नोंदणीतून राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल ३४ हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. यंदा दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत महसुलात सुमारे पाच हजार कोटींची वाढ झाली आहे.

राज्याला मार्च २०२२ अखेर दस्त नोंदणीतून ३२ हजार कोटींचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हे उद्दिष्ट २९ हजार कोटी रुपये करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना नागरिकांचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा कलही वाढला. मार्चअखेर राज्यात २३ लाख ७० हजार ४०८ दस्त नोंदणी झाली आहे. त्यातून राज्य सरकारला ३४ हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. महसुलात वाढ झाली असली तरी दस्त नोंदणीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

मार्चअखेरमुळे मागील आठवड्यात दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संगणकाच्या सर्व्हर डाउनमुळे दस्त नोंदणीमध्ये अडचणी येत होत्या. परंतु या विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ववत झाली. त्यामुळे मागील बुधवारी आणि गुरुवारी राज्यात विक्रमी दस्त नोंदणी झाली. बुधवारी एकाच दिवशी २१ हजार ५०० दस्त नोंदणी होऊन २६५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तर, गुरुवारी १४ हजार ४०० दस्त नोंदणी झाली. त्यातून सुमारे २२२ कोटींचा महसूल प्राप्त झाला. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये दस्त नोंदणीसाठी नागरिकांनी अडचण येऊ नये, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ वाढवून देण्यात आली होती. तसेच, शनिवार आणि रविवारी दस्त नोंदणी सुरु होती.

पुण्यातून सहा हजार कोटींचा महसूल

पुणे जिल्ह्यात मार्चअखेर २ लाख ३० हजार दस्त नोंदणी झाली. जिल्ह्यासाठी मार्चअखेर ५ हजार ३० कोटींचे उद्दिष्ट्य होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे उद्दिष्ट्य ४ हजार ७५० कोटी इतके करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यातून उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे सुमारे सहा हजार कोटींचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे.

Web Title: Decrease Revenue Deed Registration Increase Revenue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top