
पुणे : येत्या मंगळवारी बेरोजगारांसाठी दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
पुणे : पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एस.एन.डी.टी.) गृहविज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर व जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी येत्या मंगळवारी (ता. २८) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा कर्वे रोड येथील जेडीबीआयएमएसआर (एमबीए इमारत), एस.एन.डी.टी. महाविद्यालय, महर्षी कर्वे विद्याविहार, पुणे येथे होणार असल्याचे पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी गुरुवारी (ता.२३) सांगितले.
या मेळाव्यात बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे शहर, भोसरी व पिंपरी-चिंचवड या औद्योगिक परिसरातील एकूण २५ कंपन्या सहभागी होणार आहेत. या सर्व कंपन्यांकडे मिळून विविध पदांच्या एकूण ४ हजार ८८३ जागा रिक्त आहेत. या सर्व रिक्त जागांसाठी किमान दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर, आयटीआय पदविका, अभियांत्रिकी पदवी, बीबीए, एमबीए, वित्त, मार्केटिंग, बी. एस्सी., एम. एस्सी., अन्न प्रक्रिया, बीएएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस, पीजीडीएम, पीजीडीएचएम, डिजिटल मार्केटिंग, बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएम आदी विविध पात्रताधारक बेरोजगार युवक पात्र असणार आहेत.
मेळाव्यात सहभागासाठी हे करा
शहर व जिल्ह्यातील बेरोजगार युवतींना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. शिवाय मुलाखतीला बेरोजगारांनी आपापली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणणे अनिवार्य असल्याचे उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे यांनी सांगितले.
Web Title: Deendayal Upadhyay Employment Gathering For The Unemployment On Tuesday 28 June 2022 Organized District Skill Development Centers Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..