देहूरोड बाजारपेठेला हवी लष्करी शिस्त

देहूरोड बाजारपेठेला हवी लष्करी शिस्त

देहूरोड - जुनी बाजारपेठ अशी देहूरोडची ओळख. लष्करी छावणीचा परिसर असल्याने दबदबा; मात्र आता चित्र पालटले आहे. जागा मिळेल तिथे पथारी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. फेरीवाल्यांच्या हातगाड्यांचा अडथळा होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मनमानी. यात ग्राहक आणि दुकानदारांचाही समावेश. व्यापाऱ्यांनी दुकानांच्या बाहेर पदपथ व रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी मांडलेल्या वस्तू. वाहनांसाठी राबविलेल्या पी १, पी २ योजनेचा बोजवारा, अशा कारणांमुळे देहूरोड बाजारपेठेत वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. लष्करी छावणीतच वाहतूक शिस्तीचा अभाव आहे.

वस्तु:स्थिती
देहूरोड बाजारपेठेतील वाहतुकीचे चोख नियोजन करण्याची जबाबदारी कॅंटोन्मेंट बोर्ड आणि स्थानिक पोलिसांची आहे. त्या दृष्टीने कॅंटोन्मेंट बोर्डाने एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले; मात्र त्याव्यतिरिक्त ठोस उपाययोजना केली नाही. याबाबत वाहतूक पोलिसांकडूनही प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

अधिकाऱ्यांची कृतिशीलता
बाजारपेठेतील प्रमुख रस्ते अतिशय अरुंद होते. तत्कालीन कॅंटोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद चव्हाण आणि पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे बाजारपेठेत मोठी अतिक्रमण कारवाई झाली होती. त्यामुळे बाजारपेठेने बऱ्याच दशकांनंतर मोकळे रस्ते अनुभवले. वाहनांसाठी पी १, पी २ योजना राबविली. 

पी १, पी २ योजनेचा फज्जा 
बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविल्यानंतर पिंजण हॉटेल ते सुधीर एंटरप्राइजेसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ उभारला. त्यासाठी सुमारे २७ लाख रुपये खर्च आला. ठिकठिकाणी पी १, पी २ असे बोर्ड लावले; मात्र योजनेच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. याबाबत काही नागरिकांनी ‘सकाळ’कडे गाऱ्हाणे मांडले. या दोन्ही पदपथांवर व्यापाऱ्यांनी विक्रीचे साहित्य ठेवून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे.

इथे करता येईल वाहनतळ
कॅंटोन्मेंट बोर्ड आणि पोलिसांनी संयुक्त कृती कार्यक्रमाची आखणी करावी. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी. तसेच कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गालगत शंकर मंदिरासमोर काही एकर भूखंड मोकळा आहे. तसेच कॅंटोन्मेंटचे व्यापारी संकुल आणि पंडित नेहरू मंगल कार्यालय परिसरात प्रशस्त मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी बहुमजली वाहनतळांची निर्मिती करता येऊ शकते.

पथारी व्यावसायिक
बॅंक ऑफ इंडिया चौक ते वृंदावन चौक, शिवाजी विद्यालय इमारतीसमोर, महात्मा गांधी शाळेसमोर, महात्मा फुले मंडईसमोर, गणपती मंदिर ते सुभाष चौक, सुभाष चौक ते स्वामी विवेकानंद चौक आदी ठिकाणी पथारीवाले, फेरीवाले आणि हातगाड्यांवर वस्तू विकणारे असतात. 

बेशिस्तीचा कहर
ग्राहकांची वाहने थेट दुकानांपुढे उभी केली जातात. पादचारी ग्राहकांना चालणेही अवघड होते. ही स्थिती महात्मा गांधी शाळेसमोर, मंडईसमोर व सुभाष चौकात असते. येथेच पथारीवाल्यांची संख्या अधिक आहे. हातगाड्यांमुळेही वाहतुकीला अडथळा होतो. ग्राहकांची वाहनेही बेशिस्तपणे उभी केली जातात.

चाळीस फुटी रस्ता झाला २० फूट 
मुख्य बाजारपेठेत २०११-१२ मध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई झाली. मुख्य रस्ता ३० ते ४० फूट रुंद झाला. मात्र मंडईपासून जुन्या जकात नाक्‍यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी १५ ते २० फूट राहिली आहे. यास कॅंटोन्मेंट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

अतिक्रमणे काढणार
पदपथावरील अतिक्रमण, पथारीवाले, फेरीवाले, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्यासाठी बोर्डाकडे १० जणांचे अतिक्रमण विरोधी पथक आहे. त्यांच्याकडून संबंधित विक्रेत्यांना प्रथम समज देतो. नाही ऐकल्यास त्यांचे विक्री साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाते. यापुढेही कारवाई कायम राहणार असून, संबंधितांनी नियमात राहूनच आपला व्यवसाय करावा.
- आर. डी. कासार, आरोग्य निरीक्षक, कॅंटोन्मेंट

पथारीवाल्यांचा त्रास नाही
पथारी व्यावसायिकांना कॅंटोन्मेंटने जागा आखून दिली आहे. त्याच्या आत बसूनच व्यवसाय करण्याचे बंधन आहे. माझ्यासह बहुतांश पथारीवाल्यांचा वाहतुकीला कुठलाही त्रास नाही. मी गेल्या १७ वर्षांपासून साहित्य विक्रीचा व्यवसाय करते. प्रामाणिक पथारीवाल्यांवर कारवाई करू नये. नियमांच्या पालन न करणाऱ्यांवर कॅंटोन्मेंटने कारवाई करावी.
- शोभा कळसकर, पथारी व्यावसायिक
  
वारंवार कारवाई करावी 
बाजारपेठेत अनेक ठिकाणी मूळ हद्द सोडून पथारीवाले बसलेले असतात. हातगाडीवाले कुठेही थांबून व्यवसाय करतात. वाहनचालक दुकानांपुढे वाहने उभी करतात. अनेक वाहनचालक अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. यासाठी कॅंटोन्मेंटने वेळोवेळी कारवाई करावी. त्यात सातत्य ठेवल्यास संबंधित विक्रेत्यांवर वचक राहील. 
- अतुल राऊत, नागरिक

कॅंटोन्मेंट, पोलिसांचे नियोजन 
बाजारपेठेतील सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने कॅंटोन्मेंट आणि पोलिस ठाणे मिळून संयुक्त नियोजन करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाले, हातगाडीवाले यांना एक ठराविक जागा देण्यात येईल. अशा जागेचा शोध सुरू आहे. जेणेकरून त्यांचे व्यवसायही होतील आणि वाहतूक सुरळीत राहील. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
- विशाल खंडेलवाल, उपाध्यक्ष, कॅंटोन्मेंट बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com