दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
Published on

चित्रपट महोत्सवाला दिल्लीत सुरुवात


सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ : मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाला शानदार सोहळ्याने प्रारंभ झाला. भाजप सरचिटणीस व खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचेही उद्‍घाटन करण्यात आले.
डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित या उद्‍घाटन सोहळ्यास तावडे यांच्यासह निवासी आयुक्त श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.
मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव तावडे यांनी अधोरेखित केला. ते म्हणाले, ‘‘दिल्लीसह देशभरात मराठी कला, संस्कृती आणि साहित्याबद्दल मोठा आदर असून, मराठी चित्रपट व नाट्यकृतींनी अनेक हिंदी आणि इतर भारतीय भाषांतील चित्रपटांना प्रेरणा दिली आहे. दिल्लीत सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव भविष्यात मराठी नाट्य महोत्सवापर्यंत विस्तारला पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची माझी तयारी आहे.’’
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी भाषेचा परिचय दिल्लीतील मराठी तसेच इतर भाषिक नागरिकांना करून देणे हा दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ स्थापनेमागील उद्देश आहे, असे श्‍वेता सिंघल यांनी सांगितले. विवेक गर्गे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com