
दिल्लीला परतण्यापूर्वी त्याने लोणावळा-खंडाळ्याचा फेरफटका मारायचं ठरवलं होतं, मात्र..
लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' तरुणाचा आढळला मृतदेह
लोणावळ्यात (Lonavla) सहलीला आलेला एक इंजिनिअर तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. २० मे पासून हा तरुण लोणावळा आणि खंडाळाच्या जंगलात बेपत्ता होता. आज या इंजिनिअर तरुणाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळत आहे. तो मूळचा दिल्लीतील रहिवाशी असून फरहान शहा असे त्याचे नाव आहे. तो कामानिमित्त कोल्हापूरला आला होता यावेळी दिल्लीला परतण्यापूर्वी त्याने लोणावळा-खंडाळ्याचा फेरफटका मारायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे तो जंगलसफारीला गेला असता आज त्याचा मृतदहे सापडला असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा: संभाजीराजेंचा पत्ता कट? संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब
मिळालेली माहिती अशी की, फेरफटका मारत असताना फरहान शहा या जंगलात वाट चुकला होता. २० मे रोजी दुपारी अडीच्या सुमारास त्याचा कुटुंबियांशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आणि आज तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज येथे सहलीला आलेला दिल्ली (Delhi) मधील पर्यटक शुक्रवारपासून जंगलात बेपत्ता झाला होता. तो अभियंता असून दिल्ली येथे वास्तव्यास आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'
लोणावळा ग्रामीण पोलिस (Police), मावळ वन्यजीव सरंक्षक आणि शिवदुर्ग ग्रुप या युवकाचा दाट जंगलात शोध घेतला. ड्यूक पॉइंटच्या परिसरात त्याचा शोध घेताना आज त्याचा मृतदेह आढळला आहे. दरम्यान, फरहान शहा यांच्या परिवाराने एक पत्रक प्रसिद्धीसाठी काढले होते. जो कोणी बेपत्ता फरहान शहा याला शोधून काढेल त्याला एक लाखाचे बक्षीस मिळणार, असल्याचे या पत्रकात म्हटले होते. मात्र आता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
Web Title: Delhi Youth Missing Farhan Shah In Lonavala Dead Body God In Lonavala Forest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..