'इथं रोजचा खर्च भागत नाही, दिवाळी काय साजरी करणार?'

सनील गाडेकर
Saturday, 7 November 2020

बॉईजच्या विविध मागण्यांसह त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शुक्रवारी बॉईजच्या संघटनेचे प्रतिनिधी, डिलिव्हरी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : दररोज 12 ते 13 तास काम करूनही हातात 500 रुपये देखील मिळत नाही. एवढ्या पैशांत रोजचा खर्चच भागत नाही. त्यामुळे दिवाळी काय साजरी करणार? आम्हाला कामगार म्हणून सामावून घेतले असते, तर आता थोडाफार बोनस मिळाला असता. त्यातून आमचीही दिवाळी गोड झाली असती, अशी व्यथा आहे फूड डिलिव्हरी बॉय सतीश पवार यांची.

Positive Story: बचत गटांतील महिलांनी खरेदी केल्या ४३ बस; संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली दखल​

डिलिव्हरी पार्टनर या गोंडस नावाखाली पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 35 हजार रायडर फूड डिलिव्हरीचे काम करत आहेत. कमी अधिक प्रमाणात सर्वांचीच स्थिती सध्या सतीश यांच्यासारखी आहे. त्यामुळे बॉईजला कामगारांच्या व्याख्येत समजावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पुरेसे पैसे मिळत नसल्याने बॉईज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कामगारांचा दर्जा मिळाला तर ठराविक पगार, सुटी आणि कामगारांना मिळणा-या इतर सुविधा मिळतील, या आशेवर बॉईज काम करीत आहेत.

दिवाळीचा किराणा आणि कुटुंबातील इतर व्यक्तींना कपडे घेतल्यानंतर स्वतःला कपडे घेऊ शकणार नाहीत, असे अनेक बॉईज आहेत. रोजचा 200 ते 250 किलोमीटर प्रवास होत असल्याने शरीराची एवढी झीज होते. पण त्या बदल्यात मिळणाऱ्या पैशांचा विचार केली की बॉईज निराश होतात, असे सतीश यांनी सांगितले.

पुणे पोलिस 'अॅक्‍शन मोड'वर; शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा 'हल्लाबोल'!​

बैठकीला कंपन्यांच्या प्रतिनिधींची दांडी :
बॉईजच्या विविध मागण्यांसह त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शुक्रवारी बॉईजच्या संघटनेचे प्रतिनिधी, डिलिव्हरी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यास कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दांडी मारली. त्यामुळे या बाबत आता पुन्हा 24 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अचानक कामावरून कमी करण्यात आलेल्या बॉईजला परत कामावर घेण्याची मागणी आम्ही केली आहे. ती मान्य करीत त्या बाबत संबंधित कंपन्यांना सूचित करण्याचे आश्वासन कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहे. बॉईजला कामगाराचा दर्जा आणि समान वेतन मिळावे, यासाठी आमचा लढा सुरू आहे.
- अजय शिंदे, शहराध्यक्ष, मनसे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delivery boys are in financial trouble for not getting enough money