पावसाने बदलली बारामती- इंदापूरची गणिते, जलसंपदा विभागाकडं वेगळंच मागणं

कल्याण पाचांगणे
Monday, 7 September 2020

बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलसंपदा खात्याने मागिल आठवड्यात खरीप हंगामातील पहिले आवर्तन सोडले खरे, परंतु रविवार (ता. ६) रात्री पडलेल्या मुसळाधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र पहावयास मिळाले.

माळेगाव (पुणे) : बारामती व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जलसंपदा खात्याने मागिल आठवड्यात खरीप हंगामातील पहिले आवर्तन सोडले खरे, परंतु रविवार (ता. ६) रात्री पडलेल्या मुसळाधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र पहावयास मिळाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आता जलसंपदा खात्याकडे आवर्तन बंद करण्याची विनंती केली, तर काही शेतकऱ्यांनी अक्षरशः विद्युत पंपाद्वारे शेतातील पाणी नीरा डावा कालव्यात पुन्हा सोडल्याचे दिसून आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी १ सप्टेंबर रोजी नीरा डावा कालव्याद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी खरीपातील पहिले आवर्तन सोडले होते. या पार्श्वभूमीवर कालव्यात प्रशासनाने टप्पापद्धतीने सुमारे आठशे क्यूसेकने पाणी सोडले. मागणीनुसार सुरवातीला पणदरे पाटबंधारे उपविभागातील १८, १९, २२ आणि २४ फाट्यांद्वारे (वितरीका) शेती सिंचनसाठी शेतकरी पाणी घेत होते. परंतु, रविवारी बारामती, इंदापूर तालुक्यात सरासरी शंभर मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला. शेतात पाणीत पाणी चोहीकडे, अशी स्थिती झाली. विहिरी तुडुंब होऊन ओढे- नाले दुथडी भरून वाहू लागले. विशेषतः बागायत पट्ट्यात काही ठिकाणी ऊस, चारा पिके आडवी झाली. या प्रतिकूल स्थितीचा विचार करता अनेक शेतकऱ्यांनी नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद करण्याची विनंती प्रशासनाला केली, तर काही शेतकऱ्यांनी शिवारातील पाणी विद्युत पंपाद्वारे कालव्यात सोडण्याचे पाहवायास मिळाले. 

पुण्यात अत्यवस्थ रुग्णांना रक्तदात्यांची प्रतिक्षा

याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर म्हणाले की, खरिपाचे आवर्तन सोडले, परंतु सध्या झालेल्या विक्रमी पावसामुळे पाण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पूर्णतः थांबली.  बारामती, माळेगाव, पणदरे, सांगवी, नीरावागज आदी गावातील पिण्याच्या पाण्याचे साठवण तवालही भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या प्राप्त स्थितीचा विचार करता कालव्याचे पाणी बंद करण्याशिवाय पर्याय उरलेले नाही. त्याचाच एक भाग म्हणून कालव्यात ८०० क्यूसेकने होणारा पाण्याचा विसर्ग आता टप्पा पद्धतीने कमी करण्यात येईल.

कालवा देखभाल दुरुस्तीची संधी 
बारामती शहरात नीरा डावा कालव्याच्या देखभाव दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. सदरची कामे वेळत व दर्जेदार होण्यासाठी जलसंपदा खात्याने कंबर खसली आहे. परंतु, नियमानुसार व मागणीनुसार खरीपातील पहिले आवर्तन सिंचनासाठी सोडणे जलसंपदा खात्याला क्रमप्राप्त होते. रविवारी रात्री झालेल्या विक्रमी पावसामुळे कालव्यातील आवर्तन बंद होऊ शकते. सहाजिकच कालव्याच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाला पुन्हा वेग देता येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for closure of canal water in Baramati taluka