थंडीमुळे अंजीर, स्ट्रॉबेरीला मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

थंडीमुळे फळबाजारात अंजीर आणि स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. यंदा सततच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी आणि अंजिराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्के घट झाली आहे.

मार्केट यार्ड - थंडीमुळे फळबाजारात अंजीर आणि स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. यंदा सततच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी आणि अंजिराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात सुमारे ४० ते ५० टक्के घट झाली आहे. तसेच, यंदा दोन्ही फळे बाजारात महिनाभर उशिरा दाखल झाली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घाऊक बाजारात दर्जानुसार दहा किलो अंजिरास ५०० ते १००० रुपये, तर किरकोळ बाजारात ८० ते १५० रुपये भाव मिळत आहे. तसेच, दोन किलो स्ट्रॉबेरीला घाऊक बाजारात दर्जानुसार ९० ते १५० रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात १२० ते १८० रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

फळबाजारात सध्या स्ट्रॉबेरीची रोज पाच ते सात टन आवक होते. ही आवक वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भिलार आणि भोर तालुक्‍यातील काही भागांतून होते. पावसामुळे स्ट्रॉबेरीचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादन घटले आहे. नाताळ सणाला दर्जेदार स्ट्रॉबेरीची आवक नव्हती.  परंतु, सध्या दर्जेदार फळांची आवक सुरू झाली आहे. स्ट्रॉबेरीचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. पुणे शहर, उपनगरासह गोवा, इंदूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत या भागांतून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे. महाबळेश्वर आणि परिसरातून गुवाहाटी, कर्नाटक, कोलकता यांसह संपूर्ण भारतातून स्ट्रॉबेरीला मागणी असल्याचे मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले.

अंजिराची रोज दोन ते तीन टन आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिवापूर या भागातून ही आवक होत आहे. यंदा पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. मात्र, आवकेच्या तुलनेत मागणी असल्याने अंजिराचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. तसेच, अंजिराला पुणे शहर उपनगरासह येवला, मालेगाव आणि नगर जिल्ह्यातून मागणी असल्याचे अंजिराचे व्यापारी रमेश शिंदे यांनी सांगितले.

दर्जेदार अंजीर आणि स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.  कॅंडी, आइस्क्रीम, पल्प, जेली उत्पादक कंपन्यांकडून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे.
- युवराज काची, उपाध्यक्ष, मार्केट यार्ड अडते असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for figs and strawberries