
Pune Corporation : अग्नीशामक दलातील रिक्त पदे भरण्याची मागणी
पुणे : महापालिकेच्या अग्निशमन दलात तब्बल ५५ टक्के जागा रिक्त असून, ही पदे भरण्यासाठी अग्नीशमन सेवा संचालनालयाने भरती नियमावलीला मंजूरी मिळावी यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवून साडे तीन वर्ष झाली आहेत. मात्र, अद्यापही त्यास मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील पदभरती रखडली असून, ही नियमावली त्वरीत मंजूर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा: 'संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग एक ते दीड वर्षात बांधण्याचा प्रयत्न करु'
नगर जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडानंतर अग्निसुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व घडल्या तरी त्यात जिवतनाही होऊ नये यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे अग्निशमन दल मनुष्यबळासह सुसज्ज असणे आवश्यक आहे याकडे लक्ष वेधत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पदभरतीची मागणी केली आहे.
अग्नीशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. ही नियमावली नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. पण साडे तीन वर्षे उलटून गेली तरी या नियमावलीला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्नीशामक दलातील भरती रखडली आहे.
हेही वाचा: पूजा ददलानी CCTV फुटेज प्रकरण : मुंबई पोलिस नोंदविणार खंडणीचा गुन्हा?
पुण्यातील अग्नीशमन दलात ९१० पदे आहेत, त्यापैकी ५२७ पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षभरात शहरात सिरम इन्स्टिट्यूट , फॅशन स्ट्रीट येथे मोठ्या आगीच्या घटना घडून गेल्या आहेत. शहराचा विस्तार होत असताना लोकसंख्याही वाढत आहे. महापालिकेने मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तरी त्यास अद्याप मंजूरी दिलेली नाही. निमावलीची मंजूरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
Web Title: Demand Fill Vacancies Fire Brigade Pune Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..