मुळशीकरांच्या पाण्याचा निर्णय होणार अजित पवारांच्या दरबारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

मुळशी धरणातील दोन टीएमसी वाढीव पाणी मुळशीकरांना मिळावे, या मागणीची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, त्याबाबतचे लेखी शिफारसपत्र सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पाटबंधारे मंत्र्यांना नुकतेच दिले आहे.

पिरंगुट : मुळशी धरणातील दोन टीएमसी वाढीव पाणी मुळशीकरांना मिळावे, या मागणीची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, त्याबाबतचे लेखी शिफारसपत्र सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पाटबंधारे मंत्र्यांना नुकतेच दिले आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

दरम्यान, माजी सभापती रवींद्र कंधारे यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. मुळशी तालुक्यातील नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी मुळशी धरणातून दरवर्षी शासन करारानुसार १.२ टीएमसी पाणी मिळते. परंतु त्या पाण्याचे जलसंपदा विभागामार्फत वाटपाचे नियोजन पूर्ण झालेले आहे. मुळशीतील नागरिकांना शेती व पिण्यासाठी २ टीएमसी वाढीव पाण्याची गरज आहे. हे वाढीव पाणी मिळाल्यानंतर मुळशी तालुक्याचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी सुप्रिया सुळे, रवींद्र कंधारे, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.

मुळशी धरणाची पाणी साठवण क्षमता १९.२३ टीएमसी इतकी आहे. पाटबंधारे विभागाच्य़ा माध्यमातून मुळशी तालुक्यातील सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाच्या पाण्याचा वर्षभरासाठी १.२ टीएमसी इतका साठा वापरला जातो. उर्वरित सुमारे १८ टीएमसी साठा टाटा कंपनी वीज निर्मितीसाठी तसेच अन्य वापरासाठी राखून ठेवते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तालुक्यात विविध ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मुळशी प्रादेशिक योजनेतून केला जातो. याशिवाय तालुक्यातील विविध कारखाने, खासगी शैक्षणिक तसेच गृहनिर्माण संस्थांनाही या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

रवींद्र कंधारे म्हणाले, "तालुक्यातील नागरिकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेक नवनवीन मोठे प्रकल्प तयार होत आहेत. औद्योगीक क्षेत्र, हिंजवडी येथील आयटी पार्क तसेच अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक तसेच अन्य संस्था झपाट्याने वाढत आहेत.

चांदणीचौक ते पौड-ताम्हिणी-माणगाव हा राष्ट्रीय महामार्ग रुंदावत असून, भविष्यात दोन रिंगरोड तालुक्यातून जात आहेत. त्यामुळे लोकसंख्येतही झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकरणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. मुळशी धरणातील बुडीत क्षेत्रात ५२ गावांच्या शेतजमिनी धरण प्रकल्पासाठी संपादित झाल्या. परंतु या गावांनाही सिंचनासाठी पाणी मिळालेले नाही.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच माले, पौड, कोळवण, रिहे आदी खोऱ्यातील तसेच तालुक्यातील अन्य गावांना पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्य़ाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्याचे १.२ टीएमसी पाणी अपुरे पडत असल्याने मुळशी धरणातील २ टीएमसी इतके अधिकचे पाणी मुळशीतील नागरिक व शेतकऱ्यांना उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. सुप्रियाताईंनीच या मागणीची दखल घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागणार असल्याने मुळशीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for mulshikar two tmc surplus water in mulshi dam