
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नागरिकांना वेळेवर सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून येथे नगर पंचायतीला राज्य शासनाने मंजुरी द्यावी. अशी मागणी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केली आहे.
मंचर : मंचर शहरातील लोकसंख्येने ९० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नागरिकांना वेळेवर सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून येथे नगर पंचायतीला राज्य शासनाने मंजुरी द्यावी. अशी मागणी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केली आहे.
पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी
आंबेगाव तालुक्याचे मंचर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे कांदा ,बटाटा ,भाजीपाला ,कापड व सोन्या-चांदीची मोठी बाजारपेठ आहे. मंचर शहर व परिसरात अनेक दूध प्रकल्प ,इंजिनिअरिंग कॉलेज ,आवटे महाविद्यालय,इंग्रजी माध्यमाच्या शाळा , हॉस्पिटल असल्यामुळे तालुक्यातील 104 गावे व जुन्नर,खेड व शिरूर तालुक्यातील लगतच्या ७० हून अधिक गावातील नागरिकांची वर्दळ येथे सतत असते.
शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन तसेच इमारत बांधकामामध्ये सुसूत्रता, प्रशस्त रस्ते, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृह, बगीचा, अग्निशामक बंब आदी तातडीचे व महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी नगर पंचायत होणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
दरम्यान, मंचर ग्रामपंचायतीने यापूर्वी नगर पंचायतीची मागणी करणारे प्रस्ताव राज्य शासनाकडे २०१३,२०१५ व ३१ जानेवारी २०१९ रोजी सादर केले आहेत. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ भेटले आहे. “नगर पंचायतीच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे.मंचरकरना याबाबत लवकरच न्याय मिळेल.”असे वळसे पाटील यांनी सांगितल्याचे मंचर ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते लक्ष्मण थोरात भक्ते यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मंचर नगर पंचायतीचा प्रश्न सात वर्षापासून प्रलंबित आहे. नगरपंचायत झाल्यास येथे गटविकास अधिकारी दर्जाचा अधिकारी मिळेल.विकास कामांना गती येईल.नगर पंचायत मंजुरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंचर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ लवकरच भेटणार आहे. -राजाराम बाणखेले, आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य (शिवसेना )
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही ही नगरपंचायतीच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांनी दिली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या मागणीचा जोर धरल्यामुळे नगरपंचायतीच्या प्रश्न मार्गी लागणार का याविषयी शहरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)