किरकटवाडी-नांदोशी रस्ता अजूनही खड्ड्यातच; पीएमआरडीए आणि झेडपी अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

किरकटवाडी-नांदोशी रस्ता अजूनही खड्ड्यातच; पीएमआरडीए आणि झेडपी अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

किरकटवाडी : जानेवारी 2019 पासून काम सुरू असलेला नांदोशी-किरकटवाडी रस्ता अद्यापही 'खड्ड्यातच' असून पीएमआरडीए आणि जिल्हापरिषद अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

किरकटवाडीतील शेकडो सदनिकाधारक, स्थानिक रहिवासी तसेच नांदोशी-सणसनगर येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी नांदोशी-किरकटवाडी रस्ता हा एकमेव पर्याय आहे.अनेक वर्षांपासून या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्यावरुन होणारी अवजड वाहतूक यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन पीएमआरडीए च्या माध्यमातून या रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. 3 जानेवारी 2019 पासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती.परंतु काही स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला कोर्टात आव्हान दिले होते. संबंधित ठिकाणी कोर्टाने 7 मीटर रुंदीचा रस्ता करण्याची परवानगी दिली.त्यानंतर मात्र रस्ता होईल असे वाटत असताना पुन्हा नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे. पीएमआरडीए आणि जिल्हापरिषदेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्न करत आहेत.
 
वेगवेगळी कारणे सांगून कामास विलंब...शेतकरी आडवे येतात, स्थानिक पदाधिकारी सहकार्य करत नाहीत, पोलीस बंदोबस्त मिळत नाही,डांबर प्लॅंट बंद आहे, पावसाळा जाऊद्या, जिल्हा परिषदेचे अधिकारी सहकार्य करत नाहीत,पोलिसांचे पत्रच मिळाले नाही, ठेकेदाराची माणसं निघून गेलीत अशी दरवेळी वेगवेळी कारणे सांगून पीएमआरडीए च्या अधिकाऱ्यांकडून कामास विलंब केला जात आहे.अनेक वेळा पीएमआरडीए चे अधिकारी फोन उचलण्याचे कष्ट घेण्याचेही टाळत आहेत.

शिष्टमंडळाने घेतली होती अजित पवारांची भेट-किरकटवाडी, नांदोशी येथील स्थानिक पदाधिकारी,नागरिक यांच्या शिष्टमंडळाने 15 जानेवारी 2021 रोजी नांदोशी- किरकटवाडी रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.त्यावेळी तातडीने काम मार्गी लावले जाईल व बंदोबस्त देण्याबाबत पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते.

2017 पासून खुशाल करंजावणे, सागर हगवणे व इतर रहिवाशांना घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्ता मंजूर करून घेण्यासाठी स्वत: लक्ष घातले.ज्या प्रमाणे निर्देश आहेत त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी काम करुन घ्यावे. अधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गांचा अवलंब करून नागरिकांना या रस्त्याच्या समस्येतून मुक्त करावे.-नरेंद्र हगवणे, ग्रा.पं.सदस्य, किरकटवाडी.

पीएमआरडीए, जिल्हापरिषद लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे.सध्या या रस्त्यावर जीवघेणे खड्डे झाले आहेत.अधिकारी एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत काय?-कालिदास चावट, रहिवासी, किरकटवाडी.

पीएमआरडीए ची मंजुरी असल्याने आज ना उद्या रस्ता होईल या आशेवर घर खरेदी केले. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम होणार आहे, हेच ऐकत आलो आहे.माझ्यासारख्या अनेकांचा या रस्त्याचे काम रखडल्याने भ्रमनिरास झाला आहे. -प्रकाश पवार, सदनिका धारक, किरकटवाडी

ठेकेदाराची तयारी नसल्याने काम सुरू होऊ शकले नाही. आम्ही चार दिवस बंदोबस्त मागविला असून त्या तारखाही पोलीस प्रशासनाला कळविल्या आहेत. येत्या काही दिवसांत काम मार्गी लागेल.-राजेंद्र लोखंडे, उपविभागीय अभियंता, पीएमआरडीए.

22 जानेवारीला बंदोबस्त मंजूर असल्याचे पीएमआरडीए च्या अधिकाकाऱ्यांना कळवले होते.त्यांच्याकडून तयारी नसल्याचे कळले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक तेव्हा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे -सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com