'रेरा'च्या पत्रामुळे थांबलेली हवेली व मुळशीतील दस्तनोंदणी सुरू करा'

राजेंद्रकृष्ण कापसे
Thursday, 10 December 2020

जमीन मिळकतींचे व नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींच्या फ्लॅट मिळकतीचे खरेदी दस्तांची नोंदणीवर फक्त हवेली व मुळशीत निर्बंध आहेत. ते अन्यायकारक आहेत. दस्त नोंदणी होत नाही. या विषयात मार्ग काढून दस्त नोंदणी सुरू करण्याची मागणी होत आहे.

खडकवासला : शहरालगतच्या २३ गावांमध्ये रेराच्या पत्रामुळे रहिवासी, औद्योगिक व शेती झोनमधील जमीन मिळकतींचे व नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींच्या फ्लॅट मिळकतीचे खरेदी दस्तांच्या नोंदणीवर फक्त हवेली व मुळशीत निर्बंध आहेत. ते अन्यायकारक आहेत. दस्त नोंदणी होत नाही. या विषयात मार्ग काढून दस्त नोंदणी सुरू करण्याची मागणी होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड बाहेरील प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, पीएमपीचे 12 मार्ग सुरू होणार

याबाबत, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना भाजपचे पदाधिकारी व क्रिएटिव्ह फाउडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी एका पत्राव्दारे केली आहे. शहरात नव्याने 23 गावे समाविष्ट होत आहेत. या गावांमध्ये हजारो अनधिकृत बांधकामे आहेत. या इमारतींमधील सदनिकेच्या दस्त नोंदणी होत नाही. अनेक मंडळी रेराच्या निर्णयाने उद्ध्वस्त होत आहेत. खरे पाहता, दस्त नोंदणी थांबवणे कोणत्याही कायद्यात बसत नाही. असे बांधकाम व्यवसायातील तज्ञांचे मत आहे. तसे निकाल ही उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. 

अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचा विचार करु नका. पण हजारो नागरिकांनी फ्लॅट बुक केले, कर्ज काढले, कर्जाचे हप्ते ही सुरु झाले. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या सामान्य नागरिकांना कोणीच वाली नाही. दस्त नोंदणी होत नसल्याने त्यांना कर्जाचे अंतिम वितरण (disbursement) ही होत नाही.
रेराच्या नोव्हेंबरच्या पत्रामुळे ही वेळ आली आहे.

अनधिकृत बांधकामे प्रामाणिकपणे थांबवायची असेल त्याला एक अंतिम तारीख ठरवून द्यावी. त्यानंतर रेराच्या परवानगी शिवाय होणाऱ्या बांधकामांची नोंदणी होणार नाही. शेकडो इमारती ग्रामीण भागात पुण्याच्या भोवताली उभ्या राहिल्या आहेत. ही बांधकामे होताना सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होते. हे उघडच आहे.

देहू ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर; उपमुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

तरी ही 23 गावे पुण्यात घेताना याचा गांभीर्याने विचार करावा. सदनिका खरेदीदारांना दिलासा द्यावा. ह्या बांधकामांवर हातोडा चालविण्याची कारवाई करणे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्यासारखे आहे. यापूर्वी अनेक बांधकामे कधी गुंठेवारीत तर कधी दंड आकारुन नियमित केली. त्याच धर्तीवर गावांच्या समावेशापूर्वी ह्या बांधकामांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. 
बैठ्याघरांची ही खरेदी विक्रीची दस्तनोंदणी होत नाही. हे त्रासदायक ठरत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हवेली आणि मुळशी तालुक्यातील दस्त नोंदणी थांबवली आहे. उर्वरीत सर्वत्र फ्लॅटचे व तुकडा जमीनीचे दस्त केले जात आहेत. हे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for resumption of registration due to Rera's letter