Video : सांगा आम्ही जगायचं कसं ? ; सिंहगडावरील कुटुंबांचा प्रशासनाला सवाल

निलेश बोरुडे
Wednesday, 23 September 2020

 पर्यटन सुरू करण्याची मागणी

किरकटवाडी (पुणे) : मागील सहा महिन्यांपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद असल्याने गडावर वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियम व अटींसह सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करावा अशी मागणी सिंहगडावरील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांकडून होत आहे. चारशे ते पाचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह सिंहगड किल्ल्यावरील पर्यटनावर अवलंबून आहे.

ग्राहक खायला येईनात, बारला परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

 

सिंहगडावर ताक, दही, पिठलं-भाकरी, भजी व रानमेवा विकून सिंहगड व आजूबाजूच्या मेटांवर राहणारे नागरिक आपला उदरनिर्वाह चालवतात. गडाच्या पायथ्याशी आलेल्या पर्यटकांना गोळेवाडी चौकातून सिंहगड पर्यंत पोचवण्यासाठी असलेल्या वाहतूक व्यवस्थेतूनही अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होत असतो; परंतु मागील सहा महिन्यांपासून हे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. प्रशासनाकडून नियम व अटींसह इतर व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, पर्यटन स्थळे अद्यापही बंदच आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 7 जून 2020 रोजी पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांसह धरणांचा परिसर व इतर पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद राहतील असे आदेश जारी केलेले आहेत.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणेही अवघड झाले आहे. शेती किंवा इतर रोजगाराचा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने काही कुटुंबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

 

 

"रानभाज्या खाऊन आम्ही दिवस काढत आहोत. प्रशासन जे नियम ठरवून देईल त्यांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. एवढे दिवस आम्ही सहन केले परंतु आता आमच्या पोटासाठी  प्रशासनाने काहीतरी करावे. जवळचे पैसे संपल्याने किराणामाल व इतर गरजा कशा भागवायच्या? घर चालवणे अवघड झाले आहे."

-सीमा अमोल पढेर, गृहिणी, सिंहगड.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

" कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वेगाने वाढत आहे. सर्व व्यवसाय सुरू व्हावेत याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. सिंहगड व इतर ठिकाणचा बंद असलेला पर्यटन व्यवसाय सुरू करण्याबाबत लवकरच विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल."

-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand to start tourism on Sinhagad