
Shaniwar Wada : माहिमनंतर शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची मागणी, थेट राज ठाकरेंना सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम आणि सांगलितील कुपवाड मधील दर्ग्यांच्या विषय काल सभेत मांडला. यानंतर एका दिवसात माहिम येथील अनधिकृत दर्गा हटवण्यात आला. मात्र शनिवारवाड्यावरील दर्ग्याचा मुद्दा का मांडला नाही असा प्रश्न हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी राज ठाकरेंना विचारला आहे.
शनिवारवाडा परिसरातील दर्गा देखील अनधिकृत असून त्या दर्ग्याबाबत देखील निर्णय घ्यावा, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.
आनंद दवे म्हणाले, शनिवार वाड्यातील दर्ग्याच्या बाजूला एक बोर्ड लावण्यात आला आहे की तिथे मशिद होणार नाही. या जागेचा व्यावसायिक वापर होईल मुळात ही जागा मशीदच्या ट्रस्टीच्या नावे आहे. अलका चौकात देखील एक मोठी मशिद उभी आहे. मुस्लिम वस्ती शून्य असताना येथे मशिद उभी राहू नये, महानगर पालिकेने परवानगी देऊ नये, या उद्देशाने आम्ही जनजागृती करत आहोत.
राज ठाकरे काय म्हणाले होते -
माहिमध्ये दोन वर्षांपूर्वी दर्गा अस्तित्वात नव्हता, त्यामुळे हा दर्गा पाडण्यात यावा, असे राज ठाकरे म्हणाले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत राज ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला.
दर्ग्याचे बेकायदेशीर बांधकाम महिनाभरात हटवले नाही तर त्या बाजूला गणपतीचे मंदिर बांधू, असे ठाकरे म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.