...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेला एक फौजदार लोकांशी व्यवस्थित बोलत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर अजित पवार यांनी फोनवरुन आपल्या शैलीत संबंधित फौजदाराला समज दिली.

बारामती (पुणे) : कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत बेड मिळालेच पाहिजेत, खाजगी दवाखान्यांमधून रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (ता.१६) दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पवार यांनी रविवारी बारामतीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कोरोना संदर्भात काही रुग्णांना काही दवाखान्यात दाखल करून घेतले जात नाही, बेड मिळत नाही अशा स्वरुपाच्या तक्रारी आल्यानंतर अजित पवार यांनी याची गंभीर दखल घेतली. अगोदर विनंती करा, जर विनंती मान्य नाही झाली, तर कारवाई करा, असे निर्देश पवार यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच रुग्णांची हेळसांड होणार नाही, प्रत्येकाला बेड उपलब्ध होतील, गरजेनुसार ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना तशी सुविधा पुरवावी, गरज असेल तेथे खाजगी दवाखान्यातही रुग्ण दाखल करुन घ्यायला हवेत, या परिस्थितीत लोकांचा जीव वाचणे गरजेचे आहे, त्यामुळे जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे स्पष्ट निर्देशच अजित पवार यांनी दिले. सर्व डॉक्टरांनी एकत्र बसून रुग्णव्यवस्थापनाबाबत चर्चा करण्याचेही पवार यांनी नमूद केले.

- 'स्कूल बंद, फी बंद; पालकांनी सोशल मीडियावर छेडले आंदोलन 

बारामती मेडद चार पदरी रस्ता होणार...
दरम्यान बारामतीहून पुण्याला जाताना बारामती ते मेडद हा रस्ता चार पदरी करण्याचे निर्देश अजित पवार यांनी आज दिले. खंडोबानगर ते आरटीओ ट्रॅकपर्यंत रस्ता चार पदरी करण्याचे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना सांगितले. 

लोकांशी नीट बोला...
दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत असलेला एक फौजदार लोकांशी व्यवस्थित बोलत नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर अजित पवार यांनी फोनवरुन आपल्या शैलीत संबंधित फौजदाराला समज दिली. लोकांशी व्यवस्थित बोलायलाच हवे, असेही त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar ordered about take legal actions against hospitals