पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

संबंधित एजन्सीला सुविधा उपलब्ध करणे नीट जमत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पत्रकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे पत्रकारांना 50 लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याबाबत येत्या सोमवारी (ता.7) अधिवेशनात आग्रही मागणी करण्यात येईल. याबाबत आम्ही सर्वजण सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत चौकशी अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होईल. त्यात दोषी असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Breaking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; १२ सप्टेंबरपासून धावणार विशेष रेल्वेगाड्या!​

विधानभवन सभागृहात झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जम्बो रुग्णालयातील त्रुटी दूर करून रुग्णांना आवश्‍यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. रुग्णांना ऑक्‍सिजन उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांसमवेत चर्चा केली आहे. ऑक्‍सिजन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसोबतही चर्चा झाली असून, पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन उपलब्ध होईल. पिंपरीतील अण्णासाहेब मगर जम्बो रुग्णालयाबाबत तक्रार नाही. परंतु पुण्यातील जम्बो रुग्णालयाबाबत तक्रारी आल्या आहेत.

कोरोनाला आळा घालण्यासाठी शरद पवार मैदानात; पुण्यात घेतल्या बैठकांवर बैठका!​

संबंधित एजन्सीला सुविधा उपलब्ध करणे नीट जमत नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जम्बो रुग्णालयातील रुग्णांची तब्येत कशी आहे आणि उपचाराबाबत माहिती नातेवाईकांना व्हावी, यासाठी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. तसेच, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महापालिका, महसूल, आरोग्य विभाग, पोलिस, पीएमआरडीए, डॉक्‍टर्स, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यासह अन्य विभागातील कर्मचारी कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहेत. अधिकारी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत, असे पवार यांनी नमूद केले.

'वर्क फ्रॉम होम'चा आयटीयन्सच्या परफॉर्मन्सवर 'असाही' होतोय परिणाम!​

लॉकडाऊनबाबत वेगवेगळी मते : 
लॉकडाऊन उठविण्याबाबत अनेकांची वेगवेगळी मते होती. व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन उठविण्याची आग्रही मागणी केली होती. भाजीपाला, धान्य पुरवठा करण्यात अडचण येऊ नये म्हणून बाजार समितीमधील व्यवहार सुरू करण्याची मागणी करण्यात आली. उद्योग क्षेत्रावरही अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातूनही ही मागणी झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी शाळा-महाविद्यालये बंदच राहतील. मॉलमध्येही निर्बंध लादण्यात आले आहेत. सामाजिक अंतर राखण्यासोबतच मास्कचा वापर हेच कोरोनाशी लढण्याचे मुख्य अस्त्र आहे, असे पवार यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CM Ajit Pawar will raise issue of insurance protection of journalists in convention