जेव्हा अजित पवार खाली वाकून गोणपाट बाजूला सारत दर्जा तपासतात

मिलिंद संगई, बारामती
Sunday, 31 January 2021

अजित पवार यांनी अस्तरीकरणाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले खरे, मात्र शेजारी केलेल्या पाय-याच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बारामती : विकास कामे करताना ती दर्जेदारच व्हायला हवीत, असा आग्रह धरणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे किती बारकाईने प्रत्येक कामाची पाहणी करतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. रविवारी  भल्या पहाटे अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत पवार यांनी शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांना भेटी दिल्या. दिवस उजाडत असतानाच अजित पवार यांचा ताफा नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या सुरु असलेल्या कामानजिक थांबला. 

अजित पवार यांनी अस्तरीकरणाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले खरे, मात्र शेजारी केलेल्या पाय-याच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पाय-यांवर सिमेंटच्या कामाला ओल राहावी या साठी गोणपाट झाकून ठेवली होती, मात्र पवार यांनी स्वताःच खाली वाकून ही गोणपाट दूर करत काम पाहिले. 

पुण्याचा पाणी कोटा नेमका किती?

मात्र, पाय-या व्यवस्थित सिमेंटने भरल्या न गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांना खटकल्यानंतर उपस्थित कंत्राटदार आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आणि पदाधिकारी सर्वांनाच पवार यांचे खडे बोल ऐकून घ्यावे लागले. संबंधित कंत्राटदार व अधिका-यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र बांधकामातील खडा न खडा माहिती असलेल्या अजित पवारांचे त्याने काही समाधान झाले नाही. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला काम दर्जेदार लागते याची माहिती असतानाही असे काम केले तर खपवून घेणार नाही अशी तंबी द्यायला ते काही विसरले नाहीत. जाहिर भाषणात या बाबत स्वताः अजित पवार यांनी माहिती देत जनतेच्या पैशातून जी विकासकामे होतात त्याचा दर्जा चांगला राहायला हवा, या साठी प्रत्येक बारामती भेटीमध्ये मी स्वताः कामावर जाऊन कामाचा दर्जा तपासतो हे आवर्जून सांगितले. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deputy cm of maharashtra ajit pawar Work Devlpment review Pune baramati