पुण्यात 'या' परिसरातील झाडे झाली नष्ट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

स्मार्ट पुण्याची जाहिरात करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु हा पैसा सत्कारणी लागतो की उधळपट्टी, हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून केले जाणारे वृक्षारोपण व त्यानंतर वृक्षसंवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड होत आहे.

कोथरूड -  स्मार्ट पुण्याची जाहिरात करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु हा पैसा सत्कारणी लागतो की उधळपट्टी, हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून केले जाणारे वृक्षारोपण व त्यानंतर वृक्षसंवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड होत आहे. वृक्षारोपणाचे सोहळे करणारे, त्याच्या जाहिराती करणारे झाडे जगावीत म्हणून काय करतात? असे अनेक प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पौड फाटा ते कर्वे पुतळा चौकाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांपैकी काही झाडे नष्ट झाल्याचे "सकाळ'चे वाचक विकास मुळे यांनी "सकाळ संवाद'मध्ये निदर्शनास आणून दिले. पेव्हिंग ब्लॉक उकरून केलेल्या चौकोनी खड्ड्यात झाडे लावण्यात आली. त्यातील बरीच रोपे पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ झाडे लावण्याचेच काम झाले आहे. जगवण्याचे नाही, असे मुळे यांचे म्हणणे होते. 

हेही वाचा :  'या' कारणामुळे पुण्यात पुन्हा थंडी परतली!

यासंदर्भात उद्यान विभागाच्या पी. एम. आटोळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले, की या रस्त्यावर बदाम, कांचन, बकुळ, ताम्हण अशी 45 झाडे जुलै महिन्यात लावली होती. या झाडांना दर आठवड्याला टॅंकरद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. दुकानाच्या फलकाला अडथळा येतो म्हणून काही पथारीवाल्यांनी झाडांचे नुकसान केलेले दिसते. काही विकृत नागरिक झाडांची पाने कुरतडतात, फांद्या मोडतात. त्यामुळेसुद्धा झाडांचे नुकसान होते. सध्या मृत्युंजय मंदिराजवळ बांधकाम चालू असलेल्या परिसरातील झाड नष्ट झाल्याचे दिसत आहे. पादचारी उड्डाण पुलाजवळ ड्रेनेजलाइन व पदपथाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा पदपथ काढण्यात आला आहे. झाडांचे जतन करणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. झाडाचे नुकसान करणाऱ्यांना रोखायला हवे. कर्वे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूसला झाडे लावण्याचा आमचा मानस आहे. 

सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड म्हणाले, "झाडे लावण्यावर, सुशोभिकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्याचे सोशल ऑडिट होणे गरजेचे आहे. "सकाळ'ने एका चांगल्या विषयाला वाचा फोडली आहे. झाडे लावायची म्हणून लावू नका. ती व्यवस्थित वाढावी, यासाठी त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी असलेल्यांचे, झाड लागवडीवर महापालिका करत असलेल्या खर्चाचे फलक लावा. वृक्षांना नुकसान पोचविणाऱ्यांवर कारवाई करावी.' 

झाडे लावायला महापालिकेकडे जागाच उपलब्ध नाही, असे सांगण्यात येते. जे लोक झाडे लावतात, त्यांनी ती वाढतील, टिकतील यावर देखरेख ठेवली, काळजी घेतली तर झाडे जगतील. 
- गोविंद थरकुडे, माजी सदस्य, वृक्ष संवर्धन समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Destroy the trees around paud phata in pune