भाजपला फार काळ सत्तेपासून दूर ठेवू शकत नाही : फडणवीस

डॉ. संदेश शहा
Monday, 9 December 2019

राज्याच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात भाजपने 70 टक्के जागा जिंकून सुद्धा मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केल्याने आपले सरकार सत्तेत आले नाही. 40 टक्के मार्क घेणारे तीन पक्ष एकत्र येऊन मेरिटमध्ये सरकार स्थापन केले असे म्हणतात मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही.

इंदापूर : राज्यात भाजप प्रणित सरकारला जनतेने जनादेश दिला होता. मात्र, मित्रपक्षाने विश्वासघात केल्याने 40 टक्के जागा मिळालेले 3 पक्षांचे अपघाती सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्यात 19 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेले माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या क्षमतेचा आणि अनुभवाचा भाजप राज्यभर उपयोग करेल अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांशी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्याच्या प्रांगणात सुसंवाद साधला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार राम सातपुते,आमदार राहुल कुल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, बाळा-साहेब गावडे, कल्याणराव काळे, राजकुमार पाटील उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ''हर्षवर्धन पाटील यांनी प्रचंड मोठी लढत दिली असून त्यांच्यापाठीशी मोठा अनुभव आहे. असा नेता आमच्यासोबत आल्याने त्यांच्या नेतृत्वाचा, अनुभवाचा पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रात पक्ष निश्चित उपयोग करून घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी महाराष्ट्र भाजपमय करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्याच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात भाजपने 70 टक्के जागा जिंकून सुद्धा मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केल्याने आपले सरकार सत्तेत आले नाही. 40 टक्के मार्क घेणारे तीन पक्ष एकत्र येऊन मेरिटमध्ये सरकार स्थापन केले असे म्हणतात मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही. भाजपस फार काळ सत्तेपासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे आपला विजय निश्चितआहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, की इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका असून 1952 पासून या तालुक्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी जनतेच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देवून जनतेच्या आग्रहास्तवभाजपात प्रवेश केला. इंदापूर विधानसभा निवडणुकीतपक्षास 1 लाख 12 हजार विक्रमी मतदान कमळ चिन्हा वर झाले. राज्यातील राजकीय परिस्थिती मुळे  आपले सरकार स्थापन होऊ शकले नाही. मात्र यामध्ये आमचा तालुका कमी पडला याचे शल्य आम्हाला वाटते. कदाचित पाच ते दहा तालुक्यात आपले आमदार निवडून आले असते तर राज्यात आपलीच सत्ता आली असती. आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत. स्वागत तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास कदम तर आभार प्रदर्शन माऊली वाघमोडे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis says not possible to BJP outside government