
पुणे : ‘‘महाराष्ट्रात २०१९ मध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील पोलिसांच्या स्पर्धेवेळीच पोलिसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचे आम्ही निश्चित केले होते. मात्र, मध्यंतरी आमचे सरकार नसल्याने आणि कोरोनामुळे ते काम थांबले. या कामाला आता गती देणार असून पुण्यात पोलिसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक, सोई सुविधा असणारे क्रीडा संकुल व वसतिगृह उभारण्यात येईल,’’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र पोलिस दलाच्यावतीने रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दोन येथे ‘अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०२२’ चे आयोजन केले गेले होते. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन, आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, भीमराव तापकीर, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, राज्य राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस उपमहानिरीक्षक दीपक साकोरे, ‘इंटेलिजन्स ब्युरो’चे संचालक आर. चंद्रशेखर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘खेळामुळेच व्यक्ती परिपूर्ण बनतो. खेळ जिंकण्याची सवय लावतो, तसेच अपयश सहन करण्याची ताकदही देतो. महाराष्ट्रात ज्या खेळाडूंनी देशात नाव उंचावले, त्यांना महाराष्ट्र सरकारने नोकरी देत त्यांचा सन्मान केला. भारतीय लष्कर देशाच्या सीमा बळकट करते, तर पोलिस दल देशांतर्गत सुरक्षितता जपण्याचे काम करते. या स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी चांगली झाली’’
पंजाब अव्वल, महाराष्ट्र तृतीय
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ७ खेळांचे प्रकार होते. स्पर्धेत २८ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत सर्वसाधारण गटामध्ये पंजाबच्या संघाने प्रथम, तर ‘आयटीबीपी’ संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या यजमान महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.