

मुंबई, ता. २९ : ‘‘उद्धवजींनी २०१९ पर्यंत जेव्हा जेव्हा फोन केला, तेव्हा तेव्हा मी गेलो; मात्र २०१९ नंतर त्यांनी मला बोलावलेच नाही. अन्यथा मी गेलो असतो. मी वाटच पाहत राहिलो. सर्वच लोक डाव्या बाजूने गेले म्हणून मी जाणीवपूर्वक उजवीकडे आलो’’, अशी मिस्कील टिपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. २९) दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडले, या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याच्या सुरुवातीला सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी कधीही फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात, असा उल्लेख केला. तोच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीसांनी २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांनी मला बोलावलेच नसल्याचे मिश्किलपणे सांगितले. फडणवीस यांच्या या विधानावर सभागृहात एकच हशा पिकला. या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यानंतर शेवटी फडणवीस यांचे भाषण झाले. यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘कार्यक्रमात शेवटी भाषण देण्याचा फायदा म्हणजे राज ठाकरे यावर उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे आज मी काहीही बोललो त्यावर प्रतिषटकार येणार नाही.’’
दरम्यान, मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र दालन उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचेही सहकार्य घेणार असल्याचे ते म्हणाले. ‘‘एका संपादकीय लेखातून मांडला जाणारा आशय व्यंगचित्रातूनही प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. राजकीय व्यक्तींवर व्यंगचित्रे काढली जातात तेव्हा नाराज न होता त्यांचा आनंद घ्यावा,’’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे यांची टोलेबाजी
मंत्री शेलार यांनी केलेल्या विधानावरून राज यांनी भाजपला मिस्कील टोला लगावला. ‘‘२०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झाले. याच्यापुढे मी काय बोलू’’, असे राज ठाकरे म्हणाले. ‘‘एकमेकांवर टीका करणारे नेते एकाच मंचावर आल्याची बातमी होत असली, तरी काही व्यासपीठ राजकीय मतभेदांच्या पलीकडे असतात. कला, संगीत आणि अगदी लग्नसमारंभासारख्या प्रसंगीही मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असते. राजकीय पातळीवर दररोज टीका आणि मतभेद होत असले, तरी अशा कार्यक्रमांत एकत्र सहभागी होणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे’’, असे राज म्हणाले.
टीका सहन करावी : उद्धव
उद्धव ठाकरे यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान लॉयड जॉर्ज यांचा एक प्रसंग सांगितला. पंतप्रधानपदाचा ताण असूनही हसतमुख कसे राहता येते, यावर जॉर्ज यांनी ‘डेली एक्स्प्रेस’ हे वृत्तपत्र वाचत असल्याचे सांगितले. वृत्तपत्राच्या धोरणांशी मतभेद असतानाही त्यातील स्ट्रूप यांची व्यंगचित्रे पाहून दिवस आनंदात जात असल्याचे जॉर्ज म्हटले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जॉर्ज यांचा दाखला देत व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्यावर त्यावर रागावणे, वृत्तपत्र बंद करण्याची भूमिका घेणे किंवा व्यंगचित्रकारावर कारवाई करण्याऐवजी त्यातून व्यक्त होणारी टीका कशी स्वीकारली जाते, हे महत्त्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.