मधुमेहामुळे स्त्रियांमध्ये वाढतोय वंध्यत्वाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnent-women

मधुमेहामुळे स्त्रियांमध्ये वाढतोय वंध्यत्वाचा धोका

पुणे : मधुमेहामुळे स्त्रियांमधील वंध्यत्वाचा धोका वाढत आहे. रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे नियंत्रित करणे, सक्रिय राहणे आणि संतुलित आहार या त्रिसूत्रीने स्त्रिया आपल्या शरीरावर होणारे मधुमेहाचे दुष्परिणाम निश्चित कमी करू शकतात, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला.

मधुमेह हा वयाच्या साठीनंतरचा आजार ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. मधुमेहाचे वय आता तिशी-पस्तीशीपर्यंत आले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम देशाच्या तरुण पिढीवर होताना दिसतो. मधुमेहाचा दुष्परिणाम डोळे, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, हृदय या अवयवांवर होतो. तसाच त्याचा दूरगामी परिणाम महिलांमध्ये गर्भधारणा आणि वंध्यत्वावर होत असल्याचे समोर येत आहे. मधुमेह या आजाराचा स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव पडतो. त्यामुळे मधुमेही स्त्रियांनी आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मधुमेहामुळे स्त्रियांमध्ये वाढतोय वंध्यत्वाचा धोका

मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणाल्या, इन्शुलिनच्या प्रतिकारामुळे ‘पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’मुळे (पीसीओएस) वंध्यत्व होऊ शकते. रक्तातील साखरेची उच्च पातळी ही देखील गर्भधारणेदरम्यानचा मधुमेह म्हणून ओळखला जातो. यामुळे अकाली प्रसूती, गर्भपात होण्याची शक्यता वाढते. तसेच बाळांमध्ये जन्मतः दोष देखील आढळून येऊ शकतात. नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी क्लिनिकच्या वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. निशा पानसरे म्हणाल्या, मासिक पाळीच्या अनियमिततेशी आणि कमी प्रजनन दराशी मधुमेहाच्या ‘टाइप १’ आणि ‘टाइप २’ या दोन्हींचा संबंध आहे. बैठी जीवनशैलीमुळे प्रजनन काळात मधुमेह झाल्याचे निदान होते. या स्त्रियांमध्ये ‘फेलोपियन ट्यूब’सारख्या पुनरुत्पादन अवयवांना संसर्ग होण्याची शक्यता असते. साखरेच्या वाढत्या पातळीमुळे मॅक्रोसोमिया (बिग बेबी सिंड्रोम) होऊ शकतो.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

स्त्री-आरोग्यावर होणारे दुष्परिणाम...

 • हृदयविकाराचा धोका, उपचारात गुंतागुंत वाढण्याची शक्यता

 • अंधत्व, मूत्रपिंड विकार, नैराश्याचा धोका

 • मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय)

 • मासिक पाळीवेळी जास्त स्राव, वेदना होऊ शकतात

 • रजोनिवृत्तीच्या समस्या

 • इन्शुलिनच्या प्रतिकारामुळे ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’मुळे वंध्यत्व येऊ शकते

काय केले पाहिजे?...

 • संतुलित जीवनशैलीला प्राधान्य गरजेचे

 • फायबरयुक्त आहार घ्या

 • आहारात ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि मसूरचा समावेश असावा

 • जंक फूड, तेलकट, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ कमी करा

 • शर्करायुक्त पेय, मिठाई, शीतपेयाचे सेवन टाळा

 • आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा

 • नियमित व्यायाम करा

 • दररोज रक्तातील साखरेची पातळी तपासा

loading image
go to top