
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘संवाद दिन’
पुणे : लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी आता दर महिना ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे आता वेळेत निवारण होण्याची चिन्हे आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत मान्यता प्राप्त खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर अशा तीन स्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. जिल्हा स्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा दिन आयोजित करण्यात येईल.
प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक हे या दिनाचे अध्यक्ष असतील. तर विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हा दिवस आयोजित करण्यात येणार असून विभागीय शिक्षण उपसंचालक हे त्या दिवसांचे अध्यक्ष असणार आहेत. तर राज्य स्तरावरील संवाद दिन प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित केला जाईल, त्यावेळी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक हे अध्यक्ष असणार आहेत. संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी अर्जदाराला अंतिम उत्तर संवाद दिनानंतर शक्य तितक्या लवकर आणि एका महिन्याच्या आत देणे आवश्यक राहील, असेही शालेय शिक्षण विभागाने उप सचिव टि. वा. करपते यांनी अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
न्यायप्रविष्ट प्रकरणे
आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज
अंतिम उत्तर दिलेल्या प्रकरणी पुन्हा त्याच विषयाचे अर्ज
वैयक्तिक स्वरूपाची नसलेली तक्रार/निवेदन
अर्ज स्विकृतीचे निकष :
अर्ज शासनाने दिलेल्या नमुन्यात असावा
तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी
तिन्ही स्तरांवरील ‘संवाद दिना’ करिता अर्जदाराने किमान १५ दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक
‘‘आतापर्यंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या त्या-त्या संघटनांकडे दाखल होत होत्या. परंतु लोकशाही दिनाच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागातर्फे ‘संवाद दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी थेट शासनाकडूनच अधिकृत प्रक्रिया राबवून तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
- जे. के. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ