बारामती : उपजिल्हा रुग्णालयात मिळतोय फक्त दोनशे रुपयांत डायलेसिस उपचार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 March 2020

सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने कायम स्वरुपी डायलिसिस ऑपरेटर हे पद जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपलब्ध करुन दिले आहे.

बारामती : सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने कायम स्वरुपी डायलिसिस ऑपरेटर हे पद जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे येथील डायलेसिस सेवा सुरु झाली असून, आज पहिल्या रुग्णाने या सेवेचा लाभ घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

ज्येष्ठ नागरिक, बीपीएल रेशनकार्ड धारकांसाठी ही सेवा मोफत असून, इतर रुग्णांसाठी केवळ दोनशे रुपयात ही सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. 

मुंबईच्या सिध्दी विनायक ट्रस्टच्या वतीने राज्य सरकारला 34 डायलेसिस मशिन देण्यात आल्या आहेत. या मशिन राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन डायलेसिस मशिन देण्यात आल्या होत्या. मात्र, या मशिनच्या वापरासाठी आवश्यक असणारे डायलेसिस ऑपरेटर हे तांत्रिक पद सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरु झाली नव्हती. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासाठी पूर्ण वेळ कंत्राटी स्वरुपाचे डायलेसिस ऑपरेटर पद उपलब्ध करुन दिले. तसेच बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडीसिन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा या उपक्रमासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वात पहिल्यांदा बारामती शासकीय रुग्णालयात ही सेवा सुरु झाली आहे. मंगळवारी पहिल्या रुग्णाने या सेवेचा लाभ घेतला. 

डायलासिसची सेवा खासगी रुग्णालयात घेण्यासाठी साधारणत: बाराशे ते दोन हजारांपर्यंत खर्च येतो. बारामती उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी केवळ दोनशे रुपयांत ही सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात असणाऱ्या दोन मशिनवर दिवसांत चार रुग्ण ते सहा रुग्णांना डायलेसिस सेवा देता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dialysis Treatment started in Baramati Hospital