मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या भिडे वाड्यावर ओढवली बिकट परिस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

difficult situation on Historical heritage BHIDE WADA girls education Bottles of liquor packs of cigarettes pune

मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या भिडे वाड्यावर ओढवली बिकट परिस्थिती

पुणे : भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला भिडे वाडा; म्हणजेच देशातील मुलींची पहिली शाळा. पण मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या या वाड्याचा पाया आता खचला आहे. एवढंच नव्हे, तर हा वाडा अत्यंत बिकट परिस्थितीत असून येथे दारूच्या बाटल्या, बिछाना टाकल्याचे उघडकीस आले आहे. ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या वाड्यात आता दारूच्या पार्ट्या आणि व्यसनांचे प्रकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

या वाड्याच्या खोल्यांमध्ये दारूच्या बाटल्या, वेफर्सच्या पाकिटांचा कचरा, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच पडल्याचे पाहायला मिळते. हे कमी होते की काय पण येथे अक्षरक्ष: जमिनीवर घातलेला बिछाना, दोरीवर वाळत घातलेले कपडेही असा प्रकार निदर्शनास येत आहे. वाड्याची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था पाहून त्याचा बचाव करण्यासाठी ‘भिडे वाडा बचाव मोहीम यांनी पुढाकार घेतला आहे. भिडे वाड्यात घडणाऱ्या गैरप्रकाराविरोधात फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राजेंद्र लांडगे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भिडे वाडा बचाव मोहिमेचे संस्थापक प्रशांत फुले आणि पाक्षिक अरिहंतच्या मुख्य संपादिका गीताई गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.

‘‘देशातील मुलींची पहिली शाळा अशी ओळख असणारा हा वाडा दारूचा अड्डा बनला आहे. येथे पाहणी केल्यानंतर अनेक धक्कादायक आणि संतापजनक बाबी उघडकीस आल्या आहेत. पुणे महापालिकेचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर याकडे लक्ष घालून महापालिकेने या वाड्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमावा. कोणतीही वास्तूला राष्ट्रीय स्मारक जाहीर करण्यात येते, तेव्हा वास्तूची कोणतीही हानी होऊ नये, यासाठी तेथे सुरक्षारक्षक नेमणे बंधनकारक आहे. असे असूनही आजपर्यंत येथे महापालिकेच्या वतीने सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. महापालिका याकडे जाणून-बुजून काणाडोळा करते का!, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.’’

‘‘भिडे वाड्याच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने येथे तातडीने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा. तसेच भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक उभारून येथे पुन्हा मुलींसाठी शाळा सुरू करण्यात यावी,’’ अशी मागणी भिडे वाडा बचाव मोहिमेचे संस्थापक प्रशांत फुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Difficult Situation On Historical Heritage Bhide Wada Girls Education Bottles Of Liquor Packs Of Cigarettes Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top