बारामतीच्या दिगंबर जैन मंदिराचे 141 व्या वर्षात पदार्पण

बारामतीच्या दिगंबर जैन मंदिराचे 141 व्या वर्षात पदार्पण

बारामती : ....पूर्वीची द्वादशमतीनगरी व सध्याच्या बारामतीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले येथील श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदीरास आज 141 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या जवळपास दीड शतकांच्या काळात या परिसरातील अनेक स्थित्यंतरे या मंदीराने अनुभवली असून अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. 

माघ शुध्द 13 सन 1880 मध्ये म्हणजे 23 फेब्रुवारी 1880 रोजी या मंदीराची स्थापना शेठ रामचंद मलुकचंद यांनी केली होती. बारामती पंचक्रोशीमध्ये त्या काळात जैन धर्मियांसाठी मंदीर नसल्याची उणीव लक्षात घेत या मंदीराची स्थापना करण्यात आली. 

या मंदिराचे बांधकाम 1874 मध्ये सुरु करण्यात आले व त्याचे काम 1880 मध्ये पूर्णत्वास गेले. दोन मजली हे मंदीर असून तळमजल्यावर गाभा-यात पाषाणाच्या पद्मस्थ मूलनायक 1008 श्री मुनिसुव्रतनाथ व श्री 1008 मल्लिनाथ भगवंत व श्री 1008 नमीनाथ भगवंतांच्या मूर्ती आहेत. 

याची प्रतिष्ठापना फेब्रुवारी 1880 मध्ये ताराचंद माधवजी पुत्र मलुकचंद व हिराचंद ताराचंद तथा मोतीचंद खेमचंद वागजकर पुत्र फुलचंद रामचंद गौतमचंद, रावजी यांनी वीर संवत 1936 मिती माघ शुक्ल 13 या दिवशी केली. प्रतिष्ठापना भट्टारक कनककीर्ती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. 

मंदीराचे बांधकाम दगडी असून प्रवेश करताच सभामंडप सागवानी लाकडात कोरीवकाम केलेल्या खांबात आहे. वरच्या मजल्यावरही असेच कोरीव खांब आहेत. मंदीराच्या प्रतिष्ठापनेनंतर वीस वर्षानंतर सभामंडपाचे नूतनीकरण झाले. सासवडच्या पुरंदरे सरकारच्या वाड्याचा दर्शन भाग आणून येथे सभामंडप व वरचा मजला उभारला आहे.  

बारामती शहरात 1927 मध्ये रथोत्सवास प्रारंभ झाला. भगवंताची प्रतिमा रथामध्ये ठेवून शोभायात्रा काढली जाते, ही परंपरा आजही अखंडपणे सुरु आहे. बारामतीत मार्गशिर्ष वद्य दशमीला रथयात्रा असते. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com