आमदार दिलीप मोहिते पक्षासोबत

राजेंद्र सांडभोर
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राजगुरूनगर : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 'शरद पवार साहेबांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार', असल्याचे सांगत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी ते शरद पवार यांच्या बरोबर असल्याचे संकेत दिले आहेत.

राजगुरूनगर : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 'शरद पवार साहेबांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहणार', असल्याचे सांगत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी ते शरद पवार यांच्या बरोबर असल्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातल्या आज सकाळच्या नाट्यमय घडामोडींनंतर खेडचे आमदार मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता, आपण मुंबईच्या वाटेवर असून, पक्षाच्या बैठकीसाठी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व परिस्थिती समजावून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देणार नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही बाजूंकडून संपर्क केला जात असून, आमंत्रित केले जात आहे. 

मात्र, आपण पवार साहेबांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देणार नाही, असे ते म्हणाले. विधानसभेच्या २००४ झाली झालेल्या निवडणुकीत जेव्हा खेड-आळंदीमधून मोहिते निवडून आले, तेव्हा ते अजित पवार यांचे समर्थक मानले जात होते. पक्षांतर्गत संघर्षात, अजित पवार यांचा मोहिते यांना पाठिंबा असल्याचेही त्या वेळी बोलले जात होते. 

पुढे तालुक्याच्या राजकारणात नवनवीन नेतृत्व पुढे येऊ लागले. अजितदादा आणि मोहिते दोघेही ही शीघ्रकोपी असल्याने त्यांचा संवाद राहणे कठीण जात होते. विधानसभेच्या २०१४ च्या पराभवानंतर मोहिते यांची राजकीय पीछेहाट झाली. त्यानंतर मोहिते जरा अंतर्मुख झाले व त्यांचा स्वभाव काहीसा शांत झाला. गेल्या वर्षी चाकण येथे झालेल्या मराठा आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत मोहितेंवर गुन्हा दाखल झाल्यावर शरद पवार मोहिते यांच्या पाठीशी उभे राहिले. मोहितेंचा चुलत पुतण्या शैलेश मोहिते यांनी काही दिवसांपूर्वी मोहिते यांची साथ सोडली. तरी त्यांना पक्ष संघटनेमध्ये पदे मिळत गेली.

 सध्या तर ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. याबाबत ते शैलेश यांच्यावर जाहीर टीका करायचे पण त्यांनी नेत्यांवर कधी टीका केली नाही. उघड कधी बोलले नसले तरी याची मोहिते यांच्या मनात सल असावी. त्यातच यावेळी मोहिते यांचे तिकीट जाहीर होण्यासही उशीर झाला. काहीजण दादांच्या संपर्कात असल्याची चर्चा त्यावेळी होती. 

तिकीट मिळाले तरी, जिल्ह्यात फक्त त्यांचेच तिकीट उशिरा जाहीर मिळाल्याने, काहीशी मानहानी झाल्याची भावना त्यांच्या मनात होती. या पार्श्वभूमीवर मोहिते मूळ पक्षाशी म्हणजेच शरद पवार यांच्याशी यापुढेही निष्ठावंत राहण्याची शक्यता जास्त दिसत आहे. त्यांनी प्रथमदर्शनी तसे स्पष्टही केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip mohite support to sharad pawar