'काय ते डोंगर, काय ती हिरवळ' दिलीप वळसे पाटलांची डायलॉगबाजी चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Valse Patil and Shivajirao Adhalrao Patil

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यक्रमात 'काय ते डोंगर, काय ती हिरवळ' असे म्हणताच उपस्थितामध्ये हशा पिकला.

'काय ते डोंगर, काय ती हिरवळ' दिलीप वळसे पाटलांची डायलॉगबाजी चर्चेत

मंचर - आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळ असलेल्या एकलहरे येथे शामादार बाबा डोंगराच्या पायथ्याशी (स्व.) शांताराम थोरात कुटुंबीयांनी उभारलेल्या प्रवेशद्वाराचे व अन्य कामांचे रविवारी (ता. २१) रात्री झालेल्या कार्यक्रमात 'काय ते डोंगर, काय ती हिरवळ' असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हणताच उपस्थितामध्ये हशा पिकला. घडलेल्या प्रसंगाची चर्चा जोरदार सुरु असून सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला उत्स्पुर्त प्रतिसाद नेटकाऱ्याकडून मिळत आहे.

शनिवारी (ता.२०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंचर येथे वळसे पाटील यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी घेतलेला पाहुणचाराची चर्चा राज्यभर सुरु असतानाच पुन्हा वळसे पाटील चर्चेत आले आहेत. डोंगरावर असलेल्या शामादार बाबा देवस्थान जीर्णोद्धार सोहळा व अन्य विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रम डोंगराच्या पायथ्याला हिरवळीवर झाला.

येथे असलेला डोंगर व निसर्ग सौंदर्य पाहून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गुवाहाटीत लोकप्रिय झालेल्या डायलॉगचा मोहो दिलीप वळसे पाटील यांनाही आवरता आला नाही. ते म्हणाले 'आजचा हा कार्यक्रम मनाला अतिशय आनंद देणारा आहे. एकलहरे ग्रामस्थांनी एकत्र येऊन शामादार बाबा या पवित्र स्थळाची निर्मिती केली. हे स्थळ पहिल्यानंतर मला अस वाटत 'काय ते डोंगर, काय ती हिरवळ कशाला इकडे तिकडे जाता, सगळ ओके आहे इथेच.' यावेळी उपस्थितांमध्ये झालेल्या हश्यामध्ये वळसे पाटील यांनाही हसू आवरता आले नाही. आढळराव पाटील यांनीही वळसे पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकून हसून दाद दिली.

वळसे पाटील म्हणाले 'गावकर्यांनी लोक वर्गणीतून शामादार बाबा मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. गावकऱ्यांची एकी कौतुकास्पद आहे.'

'यापुढे विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ.' असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

यावेळी विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, बाळासाहेब बेंडे, अरुणा थोरात, उषा कानडे, अरुण गिरे, सुनील बाणखेले रमेश कानडे, संदीप डोके, दत्तोबा शिंदे बाळासाहेब शिंदे नवनाथ शिंदे नसीर इनामदार उपस्थित होते. संतोष डोके यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Dilip Walse Patil Event Talking Politics Laughing Manchar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..