कामगारांचे प्रश्न मार्गी लावू - दिलीप वळसे पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

 माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी आणि कामगार प्रतिनिधींची लवकरच बैठक आयोजित करू. कायद्याला अधीन राहून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

मार्केट यार्ड - माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी आणि कामगार प्रतिनिधींची लवकरच बैठक आयोजित करू. कायद्याला अधीन राहून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्केट यार्डातील हमाल भवनात रविवारी माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, सहायक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख  उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, ‘‘मी अजून नवीन आहे. त्यामुळे मला सांभाळून घ्या. माथाडी कायद्याची अमंलबजावणी करणे, ही मागणी चुकीची नाही. याबाबत मी बैठक आयोजित करतो. सर्व अधिकारी, कामगारांचे प्रमुख प्रतिनिधी एकत्रित बसून व्यावहारिकदृष्ट्या योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.’’ 

आढाव म्हणाले, ‘‘गेली चार वर्षे कामगार म्हणून आम्ही मोठा कठीण काळ अनुभवला आहे. गेल्या ५०-६० वर्षांत जे कमावले ते गेल्या चार वर्षांत मातीत घालण्याचे काम मागील सरकारने केले. माथाडी कायदा गुंडाळला. कामगारांची ३३ मंडळे गुंडाळली. त्यातील १० हजार कोटींपेक्षा जास्त फंड कुठे गेला, हे त्यांनी सांगावे.’’

या वेळी पौर्णिमा चिक्करमाने, सुभाष लोमटे, हनुमंत बहिरट, संतोष नांगरे, डॉ. हरीश धुरट, राजकुमार घायाळ, विकास मगदूम, नवनाथ बिनवडे, शिवाजी शिंदे, चंदन कुमार उपस्थित होते. वळसे-पाटील यांच्या हस्ते सुमन गायकवाड आणि गहिनीनाथ सजगणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

माथाडी कायद्याला विरोध करणारे संभाजी पाटील निलंगेकर निवडणुकीत पराभूत व्हायला हवे होते. बरे झाले त्यांची सत्ता गेली.
- डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, राज्य हमाल मापाडी महामंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilip Walse Patil have assured that Mathadi workers will try to solve the problem in pune