
Pune News : उड्डाणपुलाचे काम झालेले नसताना घाईघाईत उद्घाटन का ?
विश्रांतवाडी : येरवडा येथील नव्याने उद्घाटन केलेल्या धर्मवीर संभाजी महाराज उड्डाणपूलावर लावण्यात आलेल्या अंदाजे तीस चाळीस किलो वजनदार असलेला दिशादर्शक फलक कमकुवत वेल्डींगमुळे उड्डाणपूलाखालून जाणाऱ्या वाहनांवर कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ एका तारेच्या साहाय्याने दिशादर्शक फलक आधार धरून आहे.
मात्र उड्डाणपूलाचे काम पूर्ण झालेले नसताना घाईघाईत उद्धाटन का करण्यात आले असा प्रश्न निर्माण होतो. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे मनोज शेट्टी म्हणाले की ही बाब गंभीर असून काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
त्यामुळेच वाहतूक विभाग व पुणे महानगरपालिकेने त्वरित संपूर्ण पुलाची पाहणी करावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व राहिलेल्या कामांची डागडुजी करून घ्यावी अन्यथा आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यासंदर्भात या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर यांनी सांगितले की उद्घाटनापूर्वी काम अगदी पूर्ण करण्यात आले होते. परंतु नंतर नागरिकांनी तेथील लोखंड कापून नेण्याचा प्रयत्न केल्याने त्याची अशी अवस्था झाली आहे. ही बाब लक्षात येताच तेथे दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.