
उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या चौकशीचे निर्देश
पुणे : उच्च शिक्षण संचालनालयातील महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलणे केल्याप्रकरणी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची व या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सार्वजनिक तक्रार कक्षाने याबाबतचे पत्र सचिवांना पाठवले आहे.
उच्च शिक्षण संचालनालयात कार्यरत असलेल्या एक लिपिक महिला फाईलवर डॉ. माने यांच्या सह्या घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी डॉ. माने यांनी महिला कर्मचाऱ्याला ‘आतापर्यंत तू झोपली होतीस का ? असा सवाल करीत असभ्य भाषा वापरल्या प्रकरणी येथील कर्मचारी वर्गाने या वर्तणुकीविरोधात लेखणी बंद आंदोलन केले होते. हृदयविकारावरील शस्त्रक्रिया झालेल्या संबंधित लिपिक महिलेने याबाबत संबंधित ठिकाणी या प्रकरणी तक्रारी केल्या आहेत. राज्यपाल नियुक्त माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर यांनी याबाबत जुलैमध्ये उच्च न्यायालयात तक्रार करीत प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत सचिवांनी हे पत्र पाठवले आहे. त्याची प्रत मुल्लर यांना नुकतीच प्राप्त झाली आहे.
डॉ. माने यांनी कर्मचाऱ्यांशी केलेल्या असभ्य वर्तणुकीच्या यापूर्वीही अनेक आल्या तक्रारी आहेत. तक्रारदारांना ते भीती दाखवून तक्रार मागे घ्यायला लावत. हे प्रकरण कळताच तक्रार मागे घेतली जाऊ नये म्हणून मी उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले असून लवकरच अहवाल समोर येईल. या पूर्वीच्या काही प्रकरणात डॉ. माने यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे, असे मुल्लर यांनी सांगितले.