जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समिती : बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द

रवींद्र पाटे
Friday, 16 October 2020

राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष व जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश उर्फ शिरीष बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द झाले आहे.

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष व जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश उर्फ शिरीष बोऱ्हाडे यांचे संचालक पद रद्द झाले आहे.या बाबतचा आदेश सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) जिल्हा उपनिबंधक  मिलिंद सोबले यांनी दिला आहे.अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.

सुमारे आठशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात अग्रेसर आहे. सतरा संचालक असलेल्या या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १६ सप्टेंबर २०१५ रोजी झाली होती.संचालकपदाची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचालकांना मुदत वाढीची लॉटरी लागली आहे. मागिल पाच वर्षांत सतरा पैकी सात संचालकाचे पद रद्द झाले आहे.

या मुळे बाजार समितीत सद्यस्थितीत दहा संचालक राहिले आहेत.संचालक पद रद्द झालेल्या सात पैकी ग्रामपंचायत गटातील चार, व्यापारी अडते गटातील एक व सोसायटी गटातील दोन सदस्यांचा समावेश आहे. या बाबत सभापती काळे म्हणाले महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ चे कलम १५ मधील तरतुदी नुसार सदस्य ज्या प्रवर्गातुन निवडून आलेलाआहे.त्या प्रवर्गाचा प्रतिनिधी असेल तो पर्यंत संचालक पद ग्राहय धरण्यात येते.सदस्यपद रद्द होईल त्याच दिवसापासून संचालकपद रद्द होते.

बोऱ्हाडे हे ओझर नं.२ ग्रामपंचायतीचे २४ ऑगस्ट २०१० ते २५ ऑगस्ट २०१५ दरम्यान सदस्य होते.जुन्नर बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक १६ सप्टेंबर २०१५ रोजी झाली होती.बोऱ्हाडे यांचे ओझर नं.२ ग्रामपंचायतीचे सदस्यपद निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्यापुर्वीच २५ ऑगस्ट २०१५ रोजी संपुष्टात आले आहे.असे असताना बोऱ्हाडे यांनी मागील पाच वर्षे बाजार समितीचे भत्ते घेतले आहेत.या बाबत बाजार समितीने सहकारी संस्था पुणे(ग्रामीण) यांना कळवले होते .त्या नुसार जिल्हा उपनिबंधक यांनी १३ ऑक्टोबर २०२० रोजी आदेश दिला आहे.
महेश  बोऱ्हाडे: या बाबत बोऱ्हाडे म्हणाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने केले आहे.मात्र माझ्यावर अन्याय झाला आहे. या मुळे मी पक्ष सदस्य पदाचा व राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director of Junnar Agricultural Produce Market Committee Borhade's post canceled