चित्रपटासाठी मी लहानपणी वडिलांचा खूप मार खाल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagraj Manjule

चित्रपटासाठी मी लहानपणी वडिलांचा खूप मार खाल्ला - नागराज मंजुळे

पुणे : माझ्या आयुष्यात चित्रपट हा जगण्याचा विषय असून त्यासाठी लहानपणी मी वडिलांचा खूप मार खाल्ला आहे. त्याकाळात चित्रपट पाहण्यासाठी पैसे नसायचे. तरीही काहीही करून पैसे जमवत मी माझा चित्रपटाबाबतचा छंद जोपासला आहे. यामुळेच आज मला विविध विषयांची मांडणी करून समाजाचे प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात यश आले, अशा शब्‍दांत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गुरुवारी (ता.२१) त्यांचा चित्रपटविषयींचा जीवनप्रवास सांगितला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मंजुळे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे आदी उपस्थित होते. मंजुळे म्हणाले, ‘‘चित्रपटाच्या माध्यमातून संवेदनशील मांडणी गरजेची आहे. त्यामुळे विविध लोकांच्या अडचणी आणि त्यांच्या दुःखावर प्रकाश टाकण्यास मदत होते. विविध चित्रपटांच्या माध्यमातून काही अंशी हे प्रश्‍न मी मांडू शकलो आहे, याचे समाधान आहे. सन २०११ मध्ये पिस्तूल्या या लघुपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार माझ्यासाठी सन्मानाचा भाग होता. त्यानंतर फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड आदी चित्रपटांच्या निर्मितीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.’’

सध्या संवेदनशील चित्रपटांची निर्मिती आवश्यक आहे. यामुळे अशा चित्रपटांच्या माध्यमातून समाजाची वेगवेगळी दुःखे मांडली जातात. मात्र, सतत तोचतोचपणा आणि आरसा दाखविणेही गरजेचे नाही. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मज्जिद आणि मंदिरावरील भोंग्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर मंजुळे यांनी सावध भूमिका घेत, सर्वांवर प्रेम हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले.

‘‘दिग्दर्शकाचे मूल्यमापन निवृत्तीनंतर व्हावे’’

समाजात विविध क्षेत्रात अनेकजण काम करत असतात. यापैकी कोणत्याही क्षेत्रातील माणसाच्या कामाचे मोजमाप हे त्याच्या सेवानिवृत्तीनंतर होत असते. मात्र अभिनेते आणि दिग्दर्शकांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. एखाद्या चित्रपटावरून अभिनेता, दिग्दर्शकांचे मूल्यमापन केले जाते. असे मूल्यमापन त्यांचे होऊ नये. अभिनेते व दिग्दर्शकांच्या कामाची तुलना अमुक-तमूक चित्रपटांसोबत झाली नाही पाहिजे. आयुष्याच्या सरतेशेवटी दिग्दर्शकासह अभिनेत्यांच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे, असे मतही नागराज मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: Director Nagraj Manjule Reveals The Journey Of Films Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top