'भोवतालच्या वेदना समजण्याची गरज'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

आपली आवड केवळ मनोरंजनापुरती मर्यादित झाली आहे, असे मत दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी व्यक्त केली. 

पुणे - ‘‘आपल्याभोवती असंख्य प्रश्‍न, समस्या आणि दु:खाने भरलेले जग आहे. ते पाहण्यासाठी कुणी सिनेमाला जात नाही, त्या वेदना समजून घेत नाही. आपली आवड केवळ मनोरंजनापुरती मर्यादित झाली आहे,’’ असे मत दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) ‘बोन्साय’, ‘वाय’ आणि ‘तुझ्या आईला’ या चित्रपटांचे दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सिनेमा समाज बदलू शकत नाही; पण विचार करायला भाग पाडतो. त्यामुळे येथे केवळ परिस्थिती मांडून मोकळे होता येणार नाही तर भविष्याचा विचार होणेही आवश्‍यक आहे.’’ स्त्री भ्रूणहत्येवर भाष्य करणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉ. अजित वाडीकर म्हणाले, ‘‘कथा काल्पनिक असल्या तरी त्या मनाला भिडतात. एका पातळीवर तुम्हाला सुन्न करतात आणि पुन्हा विचार करायलाही भाग पडतात. विषय गंभीर असला तरी मनोरंजनही हा चित्रपट करतो.’’ 

कलाकार नंदू माधव म्हणाले, की आशयघन चित्रपट बऱ्याचदा महोत्सवापुरते मर्यादित राहतात असे वाटते. मात्र, त्याचे पडसाद काही काळाने का असेना आपल्याला दिसतातच. ‘तुझ्या आईला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले, ‘‘शिवी देणे किंवा शब्दांनी इजा पोचविणे ही गोष्ट फार सामान्य समजली जाते. शारीरिक हिंसेविषयी खूप बोलले जाते; मात्र, शाब्दिक हिंसेविषयी मराठीत तरी अजून कोणी बोललेले नाही. म्हणून या संकल्पनेवर चित्रपट बनविण्याचे ठरवले.’’ 

‘पिफ’मध्ये आजचे विशेष चित्रपट
    विडो ऑफ सायलेन्स : काश्‍मीरमधील एका महिलेच्या आयुष्यातील वास्तव दाखविणारा हा चित्रपट. काश्‍मीरमधील अनेक महिलांची व्यथा यात पाहायला मिळते. (सकाळी ११ वाजता, स्थळ : एनएफएआय, कोथरूड)

    ट्रीज अंडर द सन : केरळमधील एका दलित कुटुंबाच्या नैसर्गिक आपत्तीच्या लढ्याची ही कहाणी. मुसळधार पावसात या कुटुंबाचे सर्वस्व उद्‌ध्वस्त होते. त्यानंतर त्यांना स्थलांतर करावे लागते. नवी जागा, संस्कृती, माणसे या कुटुंबासाठी अगदीच वेगळे. त्या परिस्थितीत या कुटुंबाचा जगण्याशी संघर्ष हा चित्रपट दाखवतो. (दुपारी १.३० वाजता, स्थळ : एनएफएआय, कोथरूड)

    केडी : एक ८० वर्षांचा वृद्ध काही महिन्यांपासून कोमामध्ये. अचानक तो भानावर येतो आणि कुटुंबाचा कट त्याला समजतो. तो घरातून निघून जातो. पुढच्या प्रवासात त्याच्या आयुष्यात एक १० वर्षांचा अनाथ मुलगा येतो. त्यांच्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.(सायंकाळी ६ वाजता, स्थळ ः पीव्हीआर, सेनापती बापट रस्ता)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Sameer Asha Patil expressed his opinion