esakal | दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड
sakal

बोलून बातमी शोधा

दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज सोमवारी सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सुमित्रा भावे यांच्यावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखिका, पटकथा लेखक, निर्मात्या आणि दिग्दर्शक म्हणून त्या चित्रपटसृष्टीत परिचित होत्या. सुमित्रा यांनी आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले होते.

सुमित्रा भावे यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी 1984 मध्ये लघुपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली. त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीत 14 चित्रपट हे सुनील सुकथनकर यांच्यासोबत केले होते. दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि सर्वसामान्य माणसांच्या गोष्टी त्यांनी चित्रपटातून मांडल्या. राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कारावंरही त्यांनी नाव कोरलं.

हेही वाचा: Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ; मृतांचा आकडा 500 च्या पार

सुमित्रा भावे यांचे बाई आणि पाणी हे लघुपट लोकप्रिय झाले होते. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी दोघी हा चित्रपट तयार केला. पुढे दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, घो मला असला हवा, कासव, अस्तु या चित्रपटांचेही प्रेक्षकांसह समीक्षकांनी कौतुक केलं. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांच्या चित्रपटांनी ठसा उमटवला. विचित्र निर्मिती या बॅनरखाली त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली.

पुण्यात 12 जानेवारी 1943 मध्ये सुमित्रा भावे यांचा जन्म झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेत ग्रामीण विकास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. सुमित्रा भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये काम केलं. समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करत असतानाच त्यांनी लघुपट निर्मिती करण्यास सुरवात केली होती.

loading image