
पुणे : महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्याकडील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडून प्रसिद्ध होणाऱ्या मॅपमधील आकडेवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी आकडेवारी पुन्हा-पुन्हा तपासण्याचा आदेश स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिला आहे.
स्मार्ट सिटी प्रशासनाकडून रुग्णांच्या संख्येचा आढावा घेणारा नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शहरात सुमारे 42 प्रभाग आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ते समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रभागांत (क्र. 35, 39,40, 42) 5 आणि 4 मे रोजी 124 रुग्ण असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर, 1, 2, 3 मे रोजी प्रत्येकी 121 रुग्ण असल्याचे म्हटले होते. मात्र, 26 ते 29 एप्रिल दरम्यान दररोज 62 ते 64 रुग्ण असल्याचे म्हटले आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका, स्मार्ट सिटीतील अधिकाऱयांबरोबर 30 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. त्यामुळे त्या दिवशी स्मार्ट सिटी प्रशासनाने नकाशा प्रसिद्ध केला नाही. मात्र, 1 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या नकाशात धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील चार प्रभागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 64 वरून 121 वर पोचल्याचे दिसून आले. सुमारे 57 रुग्ण कोठून वाढले, असा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींना पडला.
स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांनी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून, आरोग्य विभागाकडून आकडेवारी गोळा केली तेव्हा या चारही प्रभागांतील रुग्ण संख्या सुमारे 70 असल्याचे दिसून आले. त्यांची यादीही त्यांनी मिळविली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाकडे 121 रुग्णांबाबत विचारणा केली असता, ते खुलासा करू शकले नाही. तांबे यांनी हे तपशील 'सकाळ'कडे दिले.
याबाबत अग्रवाल यांच्याकडे विचारणा केली असता त्या म्हणाल्या, आकडेवारीच्या संकलनात काही वेळा त्रुटी राहू शकतात. त्यामुळेच त्यांची पुन्हा-पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत. आकडे नेमके स्पष्ट झाल्याशिवाय नकाशा प्रसिद्ध केला जाणार नाही. धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाबाबत नेमका प्रकार काय झाला आहे, याची खातरजमा केली जाईल.
नगरसेवक तांबे म्हणाले, कोरोनाची रुग्ण संख्या 64 असून ती एकदम 121 वर कशी पोचली, याचा शोध घेतला असता, आकडेवारीत गफलत झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्याच आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या आमच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंर्तगत राहणारे 70 रुग्ण आहेत. त्यात प्रभाग 35 मधील 44, 39 मधील 12, 40 मधील 6, आणि 42 मधील 8 रुग्ण आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या नकाशात 124 रुग्ण कसे काय दाखविण्यात आले, याबद्दल आश्चर्य वाटत आहे. म्हणूनच त्या बाबत आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.