महिला सक्षमीकरणावर भर

Nirmala-Pansare
Nirmala-Pansare

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्‍यातील निर्मला पानसरे यांची नुकतीच निवड झाली. जिल्ह्याच्या विकासासाठी नवनवीन योजना राबविण्याचा त्यांचा निश्‍चय आहे. पायाभूत सुविधांबरोबरच महिलांचे आरोग्य, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याचा, तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्‍न - जिल्हा परिषद अध्यक्षपदी आपली नुकतीच निवड झाली. निवडीनंतर जिल्ह्याच्या विकासासाठी काही नवीन योजना किंवा उपक्रमांची आखणी करणार आहात का? 
पानसरे - होय, माझ्या निवडीमुळे खेड तालुक्‍यास प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे जिल्हा परिषदेचे कामच आहे. त्यात खंड पडू दिला जाणार नाही. या पायाभूत सुविधांच्या जोडीलाच काही नवीन योजना आणि उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. यात प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि महाविद्यालयीन युवक-युवतींचे करिअर आदी उपक्रमांची नव्याने अंमलबजावणी करणार आहे. 

प्रश्‍न - महिलांचे आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी काही नवीन योजना सुरू करणार आहात का? 
- होय, आजही जिल्ह्यातील किशोरवयीन मुली आणि महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. अनेक महिलांना केवळ हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातून महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती आणि गोळ्या-औषधांचा पुरवठा करण्यात येईल. शिवाय, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगाराच्या संधी  उपलब्ध करून देणे. तसेच, शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे. एवढेच नव्हे, तर महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रश्‍न - युवक-युवतींच्या रोजगारनिर्मितीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहात?
- जिल्ह्यातील युवक-युवतींपुढे रोजगाराचा आणि करिअरचा प्रश्‍न आहे. खासगी आणि सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी जिल्हा परिषद विशेष प्रयत्न करणार आहे. त्यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत तालुकानिहाय स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, अभ्यासिकांची निर्मिती केली जाणार आहे.

प्रश्‍न - पायाभूत सुविधांसाठीच्या विकासकामांमध्ये अधिक प्राधान्य कोणत्या कामांना देणार आहात? 
- पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि शिक्षण या बाबींचा प्रामुख्याने समावेश असतो. या चारही बाबी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्‍यक आहेत. या सर्व सुविधा जिल्हा परिषदेमार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु, आजही या समस्या कायम आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. जिल्ह्यातील डोंगरी व दुर्गम भागात आजही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासते. हे टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी पाणी योजना करण्याचा संकल्प केला आहे. यामुळे जिल्हा टॅंकरमुक्त होण्यास मदत 
होईल.

प्रश्‍न - आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी थोडेसे.
- माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबांना राजकीय वारसा नाही. आई-वडील आणि सासू-सासरे हे शेतकरी कुटुंबातील आहेत. या दोन्ही कुटुंबांतून राजकारणात येणारी मी पहिलीच सदस्या आहे. खेड तालुक्‍यातील बहुळ हे माझे सासर आहे. सन २०१२ मध्ये बहुळ ग्रामपंचायत सदस्यपदी आणि नंतर सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर सरपंचपदाचा कार्यकाल सहा महिने शिल्लक असतानाच २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली. त्यानंतर २०२० मध्ये अध्यक्षपदी निवड झाली. 
(उद्याच्या अंकात ः जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com