महिला संरक्षण, कौशल्य विकासाला चालना

गजेंद्र बडे
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

पुणे जिल्ह्यातील किशोरवयीन मुली, महाविद्यालयीन युवती आणि महिलांना कौशल्य विकास आणि स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. तसेच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नवनियुक्त सभापती पूजा पारगे यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत. 

पुणे जिल्ह्यातील किशोरवयीन मुली, महाविद्यालयीन युवती आणि महिलांना कौशल्य विकास आणि स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. तसेच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या नवनियुक्त सभापती पूजा पारगे यांनी सांगितले. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रश्‍न - महिला आणि बालकांच्या विकासासाठी काही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करणार आहात का? 
पूजा पारगे -
 होय, जिल्ह्यातील महिला व 
मुलींमध्ये विविध व्यावसायिक कौशल्य विकसित करणे आवश्‍यक आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. यासाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन करणे आणि त्याचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

प्रश्‍न - किशोरवयीन मुली, युवती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करणार आहात? 
- महिला आणि मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी शाळा, महाविद्यालयनिहाय कराटे प्रशिक्षणाची शिबिरे आयोजित केली जातील. त्यात शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवती आणि महिलांना सामावून घेतले जाणार आहे. शिबिरांमधून महिला आणि मुलींमधून कराटेचे मास्टर ट्रेनर निर्माण केले जातील. त्याच अन्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊ शकतील. 

प्रश्‍न - महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय भूमिका असणार आहे? 
- महिला हाच कुटुंबाचा कणा असतो. ग्रामीण भागात आजही महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होत आहे. त्यातूनच अनेक जणी ॲनिमियाला बळी पडतात. यासाठी समुपदेशकांची मदत घेऊन आरोग्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. 

प्रश्‍न - महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांबाबत मत काय? 
- व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा महिलांना फारसा लाभ होत नाही. कारण दरवर्षी त्याच योजना असतात. पिठाची गिरणी, पिको फॉल, शिलाई मशिन वाटप करण्यात येते. त्यातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाहीत. त्यामुळे नवा पर्याय शोधण्याचा विचार आहे. याचाच एक भाग म्हणून नवविवाहित मुलींना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचे विचाराधीन आहेत. 

प्रश्‍न - शालेय विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकल वाटप योजनेत काही बदल करणार आहात का? 
- या योजनेत बदल करणार नाही. सर्वच पात्र विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेची सायकल मिळाली पाहिजे. मात्र, सध्या केवळ पाचवीपर्यंतच्या मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येतो. त्यात बदल करून सर्व पात्र विद्यार्थिनींना लाभ देण्याचा निर्णय घेतला जाईल.

(उद्याच्या अंकात सामाजिक न्याय सभापती सारिका पानसरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with pooja parage