सालियन प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

सालियन प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
Published on

सालियन प्रकरणात
अखेर गुन्हा दाखल

कोणाचेही नाव नसल्याचे सीबीआयचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली, ता. १४ (पीटीआय) : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली असून, या गुन्ह्यामध्ये कोणाचेही नाव नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, रोहन रॉय, रिया चक्रवर्ती, तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्यासह अन्य व्यक्तींची नावे असल्याचा दावा सतीश सालियन यांचे वकील ॲड. नीलेश ओझा यांनी केल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
मालाड परिसरामध्ये आठ जून २०२० रोजी एका इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या घटनेनंतर काही दिवसांनी सुशांतसिह राजपूत त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. या दोन्ही घटनांची चर्चा राज्यात खूप चर्चा झाली होती. राज्य सरकारने सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. यामध्ये कोणाचेही नाव असून, गुन्ह्याचा कट, सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी खोटे पुरावे नोंदविल्या प्रकरणी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आत्महत्येच्या सुरुवातीच्या दाव्यावर शंका व्यक्त केली होती.
“या फिर्यादीमध्ये आमदार आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सूरज पांचोली, आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक, रोहन रॉय, रिया चक्रवर्ती, परमबीर सिंह, तत्कालीन पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर, तसेच खोटे रेकॉर्ड तयार करणारे मालवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि एसआयटीचे सदस्य यांची नावे आहेत. त्यानंतर डॉ. संजय यादव आणि न्याय्यवैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषकाचेही नाव आहे. या विश्लेषकाने सामूहिक बलात्कारासंदर्भातील अहवालात बदल केल्याचा आरोप आहे. तसेच, या प्रकरणात आरोपी म्हणून अनेकांची मोठी यादी आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण घटनाक्रमाची आधीचा घटनाक्रम खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणातील पुरावे दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रथमदर्शनी प्रकरणात तथ्य आढळल्याने न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले,’’ असेही ओझा यांनी म्हटल्याचे ‘एएनआय’च्या वृत्तात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com