भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद पोचला पोलिस ठाण्यात  

नितीन बारवकर
Thursday, 3 September 2020

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे यांनी बुधवारी पाचंगे यांच्याविरुद्ध शिरूर पोलिसांकडे तक्रार केली.

शिरूर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आमदार निधीतून आरोग्य विभागासाठी दिलेल्या साहित्यावरून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले असून, आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली; तर जनतेच्या पैशांचा अपव्यय झाला असेल तर सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी आज केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमदार अशोक पवार यांनी आपल्या निधीतून 50 लाख रुपये आरोग्य विभागासाठी दिले. त्यातून मास्क, पीपीई किट, सॅनिटायझर, ईसीजी मशिन, ऑक्‍सिजन सिलिंडर, थर्मामीटर आदी साहित्य शिरूर व हवेली तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले. यावर, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी निवेदनाद्वारे शंका उपस्थित केली. व्हेंटिलेटर दिलेले नसताना आमदार पवार यांच्या फेसबुकवरून व राष्ट्रवादीच्या सोशल मीडीयातून चुकीची माहिती दिली, दिलेल्या साहित्याची एवढी किंमत होत नाही, आमदार निधीचा गैरवापर झाल्याने चौकशीची मागणी त्यांनी केली. 

पुण्यात चार लाख नागरिकांना ई पास

पाचंगे यांच्या आरोपावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे यांनी बुधवारी पाचंगे यांच्याविरुद्ध शिरूर पोलिसांकडे तक्रार केली. योग्य माहिती न घेता आमदारांची बदनामी केल्याने पाचंगे यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. यावर पाचंगे यांना गुरुवारी पोलिस ठाण्यात बोलावले. त्यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष उमेश शेळके, कायदा आघाडीचे तालुकाध्यक्ष ऍड. शिवशंकर हिलाळ, सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष काका खळदकर, उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय भोस यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर येऊन सखोल चौकशीची मागणी केली. 

खडकवासला धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काळे म्हणाले की, आमदार पवार यांनी पन्नास लाखांचा निधी आरोग्य उपकरणांसाठी खर्च करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्यातून पारदर्शकपणे निधीचा वापर होत असून, मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध झाले आहे. प्राप्त परिस्थिती कुणीही राजकारण करू नये.'' 

व्हेंटिलेटर वापराविना पडून 
शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दोन व्हेंटिलेटर 26 ऑगस्टला आले असून, ते वापराविना पडून आहेत. हे व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यासाठीचे इतर सुटे भाग आलेले नाहीत. तसेच, ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर ऑपरेटर नसल्याने त्यांचा वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते. तथापि, असे रुग्ण इथे न ठेवता ससूनमध्ये हलवावेत, असा आदेश असल्याने व्हेंटिलेटर कशासाठी पाठवले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between BJP and NCP workers in Shirur taluka