पीएमपी आणि खेड शिवापूर टोल प्रशासन यांच्यातील वादावर अद्यापही तोडगा निघेना  

pmp-bus
pmp-bus
Updated on

पुणे - ‘मला नोकरीसाठी नसरापूरहून रोज पुण्यात जावे लागते. पीएमपीची बस बंद असल्यामुळे मिळेल त्या गाडीतून जा-ये करावी लागते. स्वतःची गाडी घेऊन जायचे तर, पेट्रोल परवडत नाही अन् हायवेवरील ट्रॅफिकमुळे भीतीही वाटते. टोलचा वाद ‘पीएमपी’ने सोडवावा आणि आमच्यासाठी बस सुरू करावी, नाही तर आमचं अवघड आहे.....’ सांगत होते, नसरापूरमध्ये राहणारे भागवत कांबळे. 

पीएमपी प्रशासन आणि खेड शिवापूर येथील टोल प्रशासन यांच्यात गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरू आहेत. त्यामुळे नसरापूर, केतकवळे, कापूरहोळ आणि परिसरातील बससेवा बंद आहे. परिणामी त्या भागातील रोज किमान ५ हजार प्रवाशांची प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत कांजळे गावातील पल्लवी गाडे म्हणाल्या, ‘‘पुण्यात आम्हाला वारंवार जावे लागते. बस नसेल तर, ट्रेंपो, ट्रकमधून कात्रजपर्यंत जाते. तेथून पुढे बस करून जावे लागते. परंतु, मिळेल त्या गाडीतून जाणे धोकादायक आहे. अन गाडी कधी मिळेल, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पुण्यात जाणं अवघड झालं आहे. पूर्वी बस होती तेव्हा बरं होतं.’’

शोरे गावातील अतुल डिंबळे यांनीही ‘पीएमपी’ची बस बंद असल्यामुळे या भागातील अनेक रहिवाशांची गैरसोय होत असल्याचे म्हटले आहे. सध्या कॉलेज, शाळा बंद आहेत. म्हणून विद्यार्थ्यांचा प्रश्‍न नाही. परंतु, नोकरदार आणि व्यावसायिक ‘पीएमपी’च्या बसवरच अवलंबून आहेत. त्यांना कोणी वाली आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप म्हणाले की, पीएमपीच्या बसेस नागरिकांसाठी आहेत. त्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक दराने ‘पीएमपीला’ टोल देणे परवडत नाही. एसटीच्या बसची दिवसातून एकच खेप होते. त्यांचे तिकिटही जास्त असते. म्हणून त्यांना टोल देणे परडवते. परंतु, ‘पीएमपी’च्या एका बसच्या चार-पाच खेपा होतात. आमचे तिकीटही कमी आहे. त्यामुळे टोल देणे आम्हाला कसे परवडणार? यातून मार्ग निघाला नाही तर, तर प्रती प्रवासी पाच रुपये जास्त आकारावे लागतील. त्यातून प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड पडेल. ते चालेल का? याबाबत जिल्हाधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खेड-शिवापूर टोल प्रशासनाचे अमित भाटिया म्हणाले की, पीएमपीला आम्ही व्यावसायिक नव्हेतर, सवलतीच्या दरात मासिक पास देण्यास तयार आहोत. त्यासाठी त्यांनी बसला फास्ट टॅग बसवावा, अशी सूचना केली होती. परंतु, ‘पीएमपी’ त्यास तयार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही (एनएचएआय) टोल न देता बस वाहतूक सुरू ठेवता येणार नाही, असे ‘पीएमपी’ला सांगितले आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाने सवलतीच्या दरातील मासिक पास स्वीकारावा आणि प्रवाशांची वाहतूक सुरू करावी, अशी आमची विनंती आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेमकी अडचण काय आहे?
‘पीएमपी’ची एक बस या रस्त्यावरील टोल नाक्‍यावरून दिवसातून किमान पाच वेळा ये-जा करते, त्यामुळे प्रत्येक खेपेला नेहमीच्या दराने टोल देणे ‘पीएमपी’ला परवडत नाही. ‘पीएमपी’ही शासकीय सार्वजनिक वाहतूक सेवा आहे, त्यामुळे बसच्या प्रत्येक फेरीला टोल आकारण्यात येऊ नये, असे ‘पीएमपी’चे म्हणणे आहे. तर, ‘पीएमपी’ प्रवाशांकडून तिकीट घेते, अन्य ठिकाणी टोल देते मग खेड शिवापूर नाक्‍यावरच अडचण काय? असे टोल प्रशासनाचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अद्याप निर्णय झालेला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com