...म्हणून शासनाच्या प्रथम क्षेणीतील दोन अधिकाऱ्यांमध्ये जुंपली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

ग्णकल्याण समितीवर गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांसमवेत तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी आदींसह दोन स्वीकृत सदस्य समितीमध्ये कार्यरत आहेत. 

भोर (पुणे) : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीची बैठक आणि नामनिर्देशीत केलेल्या सदस्यांच्या कारणावरून रुग्णालायचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बामणे व गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्यामध्ये शुक्रवारी (ता.७) बैठकीदरम्यान वादावादी झाली. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्यान समितीवर गटविकास अधिकारी हे अध्यक्ष तर वैद्यकीय अधीक्षक हे सचीव म्हणून काम पाहतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बैठकीदरम्यान शासनाच्या प्रथम श्रेणीतील दोन्ही अधिकारी केवळ वादावादी होऊन थांबले नाहीत तर, प्रतिष्ठेचा विषय करून एकमेकांविरोधात तक्रारी केल्या. डॉ. बामणे यांनी तनपुरे यांच्याविरोधात भोर पोलिस ठाण्यात तर तनपुरे यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे तक्रार दाखल केली. डॉ बामणे यांनी ''तनपुरे यांनी सार्वजनिक शांततेचा भंग करून, अपशब्द वापरून व धमकावून कामात अडथळा आणला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा'' अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. याशिवाय तनपुरे यांच्यापासून मला धोका असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तर डॉ. बामणे हे रुग्णकल्याण समितीच्या सभा घेत नाहीत, अधिकऱ्यांना अपशब्द बोलून शिष्टाचार पाळत नाहीत, त्यांच्या कालावधीतील लेखापरीक्षण करावे आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी तनपुरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक औंध पुणे यांच्याकडे केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यसाठी येथे ► क्लिक करा

रुग्णकल्याण समितीवर गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांसमवेत तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी आदींसह दोन स्वीकृत सदस्य समितीमध्ये कार्यरत आहेत. बैठकीदरम्यान झालेल्या वादावादीमुळे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णकल्याण समितीचे काम पाहणारे लिपीक यांच्यासह कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयात रुग्णांसाठीच्या सेवासंदर्भात चर्चा करण्याऐवजी शासनाच्या प्रथम श्रेणीतील दोन अधिकारी एकमेकांवर आरोप करीत स्वतःची प्रतिष्ठा राखण्यात व्यस्त असल्याची खंत रुग्णांचेनातेवाईक व्यक्त करीत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांवर शासनाकडून काय कारवाई केली जाईल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute between two officers in the first grade of government at Bhor Pune