राजसत्तेवर धर्मसत्तेचे वाढतेय वर्चस्व : डहाके

dahake
dahake

पुणे - आनंदाचा क्षण मोकळेपणाने अनुभवता यावा, असे स्वच्छ वातावरण देशात आहे, असे म्हणता येणार नाही. हे ‘विश्‍वची माझे घर’ हे आता केवळ शब्दच राहिले आहेत. धर्मसत्तेचे राजसत्तेवर वर्चस्व वाढत चालले आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी देशातील आजच्या परिस्थितीचे वर्णन केले. 

‘देश हिटलरशाहीच्या नाही, तर गांधी विचारांच्या उंबरठ्यावर आहे,’ असेही ते म्हणाले. महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते डहाके यांना ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्या वेळी डहाके यांनी ही भावना व्यक्त केली. या वेळी केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मुरलीधरन, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील देशमुख, राजीव भालेराव, मासूम संस्थेच्या डॉ. मनीषा गुप्ते, रमेश अवस्थी उपस्थित होते. या प्रसंगी साहित्य व समाजकार्य करणाऱ्या केरळ शास्त्र साहित्य परिषद, राजेंद्र बहाळकर, शहाजी गडहिरे, जमिलाबेगम पठाण, नितीन रिंढे, कृष्णात खोत आणि दत्ता पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डहाके म्हणाले, ‘‘राष्ट्राच्या इतिहासात काळोखाचे क्षण असे अनेकदा येत असतात. घनदाट काळोख असला तरी ठिकठिकाणी दिवट्या पेटत असतात. या दिवट्या स्वच्छ प्रकाश देतील. हा काळ स्थलांतराचा आणि विस्थापनाचा आहे. शेतकरी आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत आणि त्या थांबविण्यासाठी उपाय कोणाकडे दिसत नाहीत. समाज स्तब्ध असला, तरी आतून घुसमटणे सुरू आहे.’’

अरुणा रॉय म्हणाल्या, ‘‘नागरिकत्व कायदा हा केवळ मुस्लिम समाजाविरोधात नाही, तर या देशातील सर्वच गरिबांच्या विरोधातला आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे. अभिव्यक्ती अधिकारावर हल्ला होत असताना बोलण्याचा हक्क युवकांनी संपादन केला आहे.’’ साधना ट्रस्टचे विश्वस्त डॉ. हमीद दाभोलकर यांनी आभार मानले. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com