esakal | पुण्यात पेट्रोल-डिझेल बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवीन आदेश; काय ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Fuel

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. वेळोवेळी निर्णय बदलत आहेत. मात्र आज झालेल्या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंप सुरू करण्यात आले असून पेट्रोल- डिझेल किती द्यायचे, याबाबत कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे नागरिकांना हवे तेवढे इंधन मिळणार आहे. 
- अली दारूवाला , प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोलियम असोसिएशन.

पंपावर नागरिकांची गर्दी 
सर्वांसाठी इंधनाची विक्री खुली झाल्याने बुधवारी दुपारनंतर नागरिकांनी पंपांवर गर्दी केली होती. यातील अनेकांनी तोंडाला मास्क देखील लावले नव्हते. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग देखील पाळले गेले नाही.

पुण्यात पेट्रोल-डिझेल बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवीन आदेश; काय ते वाचा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळण्याबाबत सुरु असलेल्या गोंधळात जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी पुन्हा नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार आता जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागात नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा पासची गरज नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोमवारी (ता. ४) महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी इतर काही दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र, पेट्रोल पंपांबाबत कोणतेही स्पष्ट आदेश दिले नव्हते. त्यामुळे शहरात गेले तीन दिवस गोंधळाचे वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.५) खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष समीर लडकत व उपाध्यक्ष सागर रुकारी यांची बैठक झाली. त्यामध्ये पंपावर रिक्षा आणि कॅब वगळता सर्वसामान्यांना पेट्रोल देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र मंगळवारी रात्री पुन्हा यात बदल करीत, सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

'दारू विक्रेत्यांनो, 'या' नियमांचे पालन करा नाहीतर...'; जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय इशारा!

मात्र बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नवीन परिपत्रक काढत जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व ठिकाणच्या पेट्रोल पंप चालकांनी सर्वसामान्यांना पास किंवा ओळखपत्राची मागणी न करता इंधन द्यावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल-डिझेलची विक्री होणार आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील पंप शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.

जीवनावश्‍यक वस्तू विक्रीस मुभा
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दुकाने सुरू करण्याबाबत नव्याने आदेश काढले आहेत. या नव्या आदेशानुसार पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. या क्षेत्रात अन्य कोणत्याही व्यवसायाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. तर उर्वरीत क्षेत्रात सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील दुकाने सुरू ठेवण्याच्या आदेशावरून यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे दुकाने सुरू ठेवावी का, कोणत्या दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर नव्याने गायकवाड यांनी हे आदेश काढले आहेत. त्यानुसार अशी ६९ क्षेत्रं निश्‍चित करण्यात आली आहेत.

बिगर अत्यावश्‍यक सेवांबाबत संभ्रम
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रात सकाळी सात ते सायंकाळी सात दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बिगर अत्यावश्‍यक सेवा अथवा वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कोणत्या व्यवसायाची दुकाने सुरू राहतील, याबाबतची यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे. या आदेशात कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे त्यावरून संभ्रम राहण्याची शक्‍यता आहे.

loading image
go to top