
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक पर्यटन स्थळे गेल्या 9 ते दहा महिन्यांपासून बंद होती. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत.
पुणे - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक पर्यटन स्थळे गेल्या 9 ते दहा महिन्यांपासून बंद होती. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. आता पुणे जिल्ह्यात सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके संग्रहालये खुले करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी मान्यता दिली. परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांनी मंगळवारी आदेश जारी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालये 31 मार्च 2020 पासून बंद आहेत. दुर्गप्रेमी आणि पर्यटक जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालयांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणाच्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुले करण्याची सातत्याने मागणी केली जात होती.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करून विविध बाबींना निर्बंधातून वगळले आहे. तसेच, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील स्मारके, संग्रहालये खुले करण्याबाबत 4 जून रोजी मानक कार्यप्रणाली लागू केली आहे.
हे वाचा - पुण्यात गिरीप्रेमी संस्थेमार्फत महिलांना गिर्यारोहणाचे धडे
या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तु, किल्ले, स्मारके, संग्रहालये मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन खुले करण्यास मान्यता देण्यात आली. शारीरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.