पोलिस अधीक्षक संदीप पाटलांची धडक कारवाई; तीन पोलिस बडतर्फ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले.

बारामती - आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे व फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले. अभिजित एकशिंगे (भिगवण पोलिस ठाणे), तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे (दोघेही बारामती शहर पोलिस ठाणे) यांना बडतर्फ केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोपट तुकाराम थोरवे (रा. म्हसोबावाडी, ता. पुरंदर) यांनी त्यांना झालेल्या मारहाणीविरुद्ध भिगवण पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्याची माहिती पोलिस कर्मचारी अभिजित एकशिंगे यांनी त्यांच्या मोबाईलवरून संबंधित आरोपींना दिली, असे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत व पोलिस त्याचा शोध घेत आहेत, याची माहिती असूनही एकशिंगे यांनी त्याच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांना दिली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती आरोपींना नव्हती. मात्र, एकशिंगे यांच्या फोननंतर आरोपी निघून गेले. त्यामुळे या गुन्ह्यात त्यांना अटक करता आली नसल्याचा ठपका एकशिंगे यांच्यावर ठेवण्यात आला. 

धक्कादायक:पुणे-मुंबई प्रवासात उबर ड्रायव्हर झोपला; महिलेनेच चालवली कॅब

दरम्यान, याच प्रकरणात बारामती शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे यांनी आरोपींशी आर्थिक सलगी करून थोरवे यांच्यावर दबाव आणून न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यास भाग पाडले, असा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला. त्यांचे कृत्य घृणास्पद व विकृत असून, पोलिस दलाच्या सचोटीस न शोभणारे व शिस्तीस बाधा असल्याचे नमूद करीत पोलिस अधीक्षकांनी या तिघांना बडतर्फ केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Police Superintendent Sandeep Patil three police suspended